Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Investment Schemes : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' ठिकाणी करा गुंतवणूक, फायद्यात राहाल

Investment

पैसा बचत करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. पण, तेवढ्यानेच काम भागत नाही. सध्याच्या परिस्थितीत तर अजिबात नाही. त्यामुळे पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे महत्वाचे आहे, तेव्हाच महागाईवर मात करता येऊ शकते. चला तर मग कुठे गुंतवणूक केल्याने महागाईशी दोन हात करता येईल, याविषयी जाणून घेऊया.

कोटीने नको पण, आपल्या गरजेच्या वेळी आपल्याजवळ असलेल्या पैशाने आपली गरज भागली पाहिजे. एवढा पैसा आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याची महागाई पाहता, ते थोड मुश्किल वाटत असले तरी शक्य आहे. कारण, जुलै 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7.43 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास छोट्या गुंतवणुकीचे पर्याय आणले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

फिक्स्ड डिपाॅझिट (FD)

तुम्ही फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असला तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँक तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. कारण, 7 दिवस ते 10 वर्ष मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटवर या बॅंका 3 टक्के ते 7.1 टक्क्यांपर्यत व्याजदर देत आहेत. तर अ‍ॅक्सिस बँक मॅच्युरिटीनंतर FD वर 3.5 टक्के ते 7.1 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. त्यामुळे या बॅंकामध्ये तुम्ही FD केल्यास, चांगला रिटर्न मिळवू शकता.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF)

तुमच्यासाठी दुसरा पर्याय पब्लिक प्रोव्हिडंट फंडचा आहे. सध्या एचडीएफसी बँक पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर सर्वसामान्यांना 7.1 टक्के व्याज देत आहे. त्यामुळे या ठिकाणी गुंतवणूक करणे ही तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. कारण, यात गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत तुम्हाला कर सवलतीचा ही लाभ घेता येणार आहे. तसेच, मॅच्युरिटीनंतरही खाते 5 वर्षांसाठी तुम्ही वाढवू शकणार आहात.

सुकन्या समृद्धी योजना

सरकारने मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमांतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेवर सध्या 8 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. जो की जुलैच्या महागाई दरापेक्षा अधिक आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मुलीच्या नावावर खाते उघडावे लागणार आहे. त्यात तुम्ही वर्षाला कमीतकमी 250 रुपये आणि जास्तीतजास्त 1.50 लाख रुपये जमा करु शकणार आहात.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) ही छोटी बचत योजना आहे, जी तुम्हाला महागाईवर मात करण्यासाठी कामी येणार आहे. तुम्ही एनएससी खात्यात पैसे जमा केल्यास, त्यावर तुम्हाला 7.7 टक्के रिटर्न मिळणार आहे. मात्र, या योजनेचा लॉक-इन अवधी 5 वर्षांचा आहे. त्यामुळे पैसे टाकल्यावर तुम्हाला 5 वर्ष पैसे काढता येणार नाही.

त्यामुळे तुम्ही जर पैसे गुंतवून महागाईवर मात करायचा विचार करत असाल तर योग्य प्लॅनिंग करुन तुम्ही वरील ठिकाणी गुंतवणूक करु शकता. कारण, या ठिकाणी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला चांगला रिटर्न ही मिळेल. तसेच, तुमचा पैसा ही सुरक्षित राहिल.

(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)