डिसेंबर 2022 ला संपलेल्या वर्षात काही छोट्या बँकांनी (Small Finance Banks) त्यांच्याकडच्या NPA चं प्रमाण 3%च्या खाली असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे वर्षभरात या बँकांनी या आकडेवारीच मोठी प्रगती केली आहे. देशभरात बुडित कर्जाचं (NPAs) प्रमाण वाढत असताना या छोट्या बँकांनी साध्य केलेल्या कामगिरीचं त्यामुळेच कौतुक होतंय.
यातली एक बँक आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) डिसेंबर 2022 पर्यंत बँकेच्या बुडित कर्जाचं प्रमाण 3.3% वर होतं. हेच प्रमाण गेल्यावर्षी 9.8% इतकं होतं. तर सर्वोदय बँकेचं (Sarvodaya Bank) बुडित कर्जाचं प्रमाण सध्या 4.26% इतकं आहे, जे गेल्यावर्षी 10.5% होतं.
‘कर्ज वसुलीसाठी केलेले शिस्तबद्ध प्रयत्न हे महत्त्वाचं कारण आहे. कारण, उज्जीवनमध्ये आम्ही वसुलीची कार्यक्षमता 99% ठेवली आहे. त्यासाठी गरज पडली तर वेळेत कर्जाची पुनर्रचना करून दिली,’ असं उज्जीवन बँकेनं आपल्या शेअर बाजारात सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
सर्वोदय बँकेनं अडचणीत आलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता विकण्याचा पर्याय स्वीकारला. ‘आम्ही वसुली होत नसलेल्या 492 कोटी रुपयांच्या कर्जासाठी 135 कोटी रुपये ग्राहकाच्या मालमत्ता विक्रीतून मिळवले.’ असं सर्वोदय बँकेनं प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सर्वोदय बँकेनं 64 कोटी रुपयांचं कर्ज माफही केलं आहे.
उज्जीवन बँकेचा कर्ज पोर्टफोलिओ मागच्या वर्षभरात 33% नी वाढला आहे. त्यांनी दिलेल्या कर्जाचं प्रमाण 21,895 कोटी रुपये इतकं आहे. वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत मात्र त्यांनी फक्त 4,838 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे.
सर्वोदय बँकेच्या कर्ज वाटपात 2022 मध्ये 11% ची वाढ झाली आहे. वर्षभरात त्यांनी 5,409 कोटी रुपयांची कर्ज दिली. तर शेवटच्या तिमाहीत त्यातल्या 1,265 कोटी रुपयांची कर्ज वाटप झालं.
दोन्ही बँकांमध्ये या कालावधीत मुदत ठेवीही मोठ्या प्रमाणात जमा झाल्या आहेत. उज्जीवन बँकेच्या मुदत ठेवींमध्ये 49% ची वाढ झाली. आणि 23,154 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी त्यांच्याकडे जमा झाल्या. तेच सर्वोदय बँकेतल्या मुदत ठेवींचं प्रमाण 4,684 कोटी रुपये इतकं होतं. तिथंही 48% इतकं वाढीचं प्रमाण होतं.
पुनावाला फिनकॉर्प या बँकेतर वित्तीय संस्थेनंही आपल्या तिमाही आकडेवारीत NPA चं प्रमाण घटल्याचं कळवलं आहे. आणि त्यांनी आपल्या बुडित कर्जाचं प्रमाण 1.5% इतकं कमी असल्याचं म्हटलं आहे.
थोडक्यात मोठ्या बँकांच्या तुलनेत छोट्या वित्तीय संस्थांनी कर्ज वसुलीत चांगला कामगिरी केली आहे.