जेव्हा जेव्हा बँकांच्या नुकसानीचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही 'एनपीए' (NPA – Non Performing Assets) बद्दल ऐकले असेल. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग अॅसेट म्हणजे अडकलेले कर्ज. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा कर्जदार कर्ज घेतल्यानंतर हप्ते फेडण्यास सक्षम नसतात तेव्हा बँकेचे पैसे अडकतात आणि बँक ते एनपीए म्हणून घोषित करते. गेल्या काही वर्षांत बँकांच्या एनपीएमध्ये अचानक वाढ झाली होती, मात्र आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरूवार, 29 डिसेंबर रोजी सांगितले की, बँकांचे ग्रॉस नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (ग्रॉस एनपीए) प्रमाण म्हणजेच बुडीत कर्जे सप्टेंबर तिमाहीत 5% पर्यंत खाली आली आहेत.
विशेष बाब म्हणजे ग्रॉस एनपीएचा हा आकडा गेल्या 7 वर्षांतील नीचांकी पातळी आहे. त्याच वेळी, बँकांचे नेट नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (Net NPA) प्रमाण सप्टेंबर तिमाहीत 1.3% पर्यंत खाली आले, जे गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी पातळी आहे. आरबीआयने आपल्या 26व्या आर्थिक स्थिरता अहवालात (FSR) म्हटले आहे की बँकेची स्थिती मजबूत आहे आणि त्यांच्याकडे पुरेसे भांडवल आहे. कर्जाचे एनपीए (NPA – Non Performing Assets) मध्ये कसे रूपांतर होते? आणि कर्जदारांवर त्याचा काय परिणाम होतो? हे आज आपण पाहणार आहोत.
कर्जाचे एनपीए मध्ये कसे रूपांतर होते?
सामान्य माणसापासून व्यावसायिकापर्यंत प्रत्येक व्यक्ती घर, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कारणासाठी बँकेकडून कर्ज घेते. कर्ज घेतल्यानंतर बँक हप्त्यांमध्ये व्याजासह कर्जाची रक्कम वसूल करते हे स्वाभाविक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI – Reserve Bank of India) च्या नियमांनुसार, बँकेच्या कर्जाचा हप्ता 90 दिवसांपर्यंत म्हणजे तीन महिन्यांपर्यंत फेडला गेला नाही, तर ते कर्ज एनपीए घोषित केले जाते. व्याज किंवा मुद्दल 90 दिवस किंवा तीन महिने किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी थकीत राहिल्यास, कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून वर्गीकृत केले जाते. मात्र, इतर वित्तीय संस्थांच्या बाबतीत, ही मर्यादा 120 दिवस आहे. बँका याला बुडीत कर्ज मानतात. एनपीएमध्ये झालेली वाढ ही बँकेच्या आर्थिक स्थितीसाठी चांगली मानली जात नाही. यासोबतच एनपीएमुळे कर्जदाराला त्रास होतो. एनपीएमुळे कर्ज घेणाऱ्या सामान्य माणसावर काय परिणाम होतो? ते जाणून घेऊया.
एनपीएमुळे कर्जदारांच्या अडचणी वाढतात
नमूद केल्याप्रमाणे, बँकेच्या कर्जाचा हप्ता 3 महिन्यांपर्यंत सतत परत न केल्यास, बँक त्या कर्जदाराचे कर्ज एनपीए म्हणून घोषित करते. याचा थेट परिणाम CIBIL रेटिंगवर होतो आणि कर्जाची वेळेवर परतफेड न केल्यामुळे CIBIL स्कोअर खराब होतो. दुसरीकडे, CIBIL खराब असताना एखाद्या व्यक्तीला पुढच्या वेळी कर्ज घेणे सोपे नसते, कारण बँक किंवा इतर वित्तीय संस्था त्याच्या कर्ज परतफेडीच्या चुकीच्या इतिहासामुळे त्याला कर्ज देण्यास टाळतात. दुसरीकडे कर्ज उपलब्ध असले तरी त्यासाठी भरपूर व्याज द्यावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगतो की CIBIL स्कोरच्या आधारावर बँका कर्जाचे व्याजदर ठरवतात. जर एखाद्या ग्राहकाचे CIBIL चांगले असेल तर त्याला कमी व्याजाने कर्ज मिळते.
वसुलीसाठी बँक कठोर पावले उचलते
एनपीएबद्दल लोकांच्या मनात एक सामान्य समज आहे की, कर्ज एनपीए घोषित केले तर बँकेची रक्कम बुडते, परंतु तसे नाही. कोणतेही कर्ज खाते एनपीए म्हणून घोषित करण्यापूर्वी, बँक त्याची 3 श्रेणींमध्ये विभागणी करते सबस्टँडर्ड मालमत्ता, संशयास्पद मालमत्ता आणि तोटा मालमत्ता. जेव्हा एखादे कर्ज खाते एका वर्षासाठी सबस्टँडर्ड असेट्स खात्याच्या श्रेणीत राहते, तेव्हा त्याला संशयास्पद मालमत्ता (doubtfull assets) म्हणतात. कर्ज वसुलीची अपेक्षा नसल्यास ती 'लॉस अॅसेट' समजली जाते. कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडून ग्राहकांना बराच वेळ दिला जातो. बँक त्याला सतत रिमाइंडर आणि नोटीस पाठवते. तरीही कर्ज घेणार्या व्यक्तीने हप्ते न भरल्यास बँक त्याच्या मालमत्तेचा ताबा घेते आणि त्याचा लिलाव करते. म्हणजेच, जर तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही, तर तुमच्या मालमत्तेचा लिलाव करुन कर्जाची रक्कम वसूल केली जाते.