कमी वयात गुंतवणुकीला सुरूवात करावी, असा सल्ला प्रत्येकजण देतात. मात्र, गुंतवणुकीला सुरुवात करण्याचे कोणतेही वय नसते. नियमित उत्पन्न सुरू असल्यास निवृत्तीनंतरही तुम्ही गुंतवणूक करू शकता. प्रामुख्याने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरते.
निवृत्तीनंतर प्रामुख्याने दैनंदिन खर्च भागवणे अथवा कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी भांडवल निर्मितीसाठी गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. या लेखातून निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात व यात गुंतवणुकीचे नक्की फायदे काय आहेत, याविषयी जाणून घेऊया.
निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी ठेवा लक्षात
उत्पन्न | निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी उत्पन्नाचा विचार करायला हवा. तुमच्याकडे उत्पन्नाचे पेन्शन व इतर मार्ग आहेत का? याशिवाय, म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना अथवा एकरकमी गुंतवणूक केल्यास इतर गरजा पूर्ण करण्याची आर्थिक क्षमता आहे का? याचा विचार करावा. |
जोखीम | वाढत्या वयाबरोबर जोखीम स्विकारण्याची क्षमता कमी होते. उत्पन्नाचे मार्ग कमी झाल्याने मोठी जोखीम स्विकारता येत नाही. त्यामुळे कमी परताव्यासह सुरक्षित गुंतवणुकीला अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे. |
कालावधी | तरूण वयात गुंतवणुकीला सुरुवात केल्यास तुमच्याकडे मोठा कालावधी असतो. त्या तुलनेत वयाची 60-70 वर्ष पूर्ण केल्यानंतर गुंतवणुकीचा कालावधी कमी होतो. जास्तीत जास्त परतावा अथवा नफा कमविण्याऐवजी भांडवल कशाप्रकारे सुरक्षित राहील, हा विचार करून गुंतवणूक करावी. |
गुंतवणुकीचा उद्देश | सेवानिवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करत आहात? याचा विचार सर्वातआधी करणे गरजेचे आहे. नियमित उत्पन्न की भांडवल वाढीसाठी गुंतवणूक करायची आहे? हे ठरवा. |
निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
नियमित उत्पन्न | तुमच्यासाठी म्युच्युअल फंड नियमित उत्पन्नाचा मार्ग ठरू शकतो. काही म्युच्युअल फंड डिव्हिडंडचे वाटप करतात. यामुळे तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्राप्त होईल, सोबत दैनंदिन खर्चासाठीही उपयोग होईल. |
गुंतवणुकीत विविधता | नेहमी लक्षात ठेवा की, तुमच्या गुंतवणुकीमध्ये विविधता असायला हवी. यामुळे नुकसान टाळता येऊ शकते. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून स्टॉक्स, बाँड्स व इतर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करता येते. निवृत्तीनंतर गुंतवणुकीतून परतावा हवा असल्यास म्युच्युअल फंड चांगला पर्याय आहे. |
सुरक्षित भांडवल | निवृत्त व्यक्ती त्यांची बचत सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यास प्राधान्य देतात. मुदत ठेवी व सोने हे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय असले तरीही यातून म्युच्युअल फंड एवढा परतावा मिळेलच असे नाही. त्यामुळे कमी जोखीमसह भांडवलाच्या सुरक्षेसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी. |
कमीत कमी गुंतवणुकीचा मार्ग | सोने, स्टॉक्स, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असणे गरजेचे आहे. मात्र, म्युच्युअल फंडमध्ये खूपच कमी रक्कमेसह गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. निवृत्तीनंतर उत्पन्न कमी झालेले असते. अशावेळी म्युच्युअल फंड कमीत कमी गुंतवणूक करण्यास चांगला पर्याय आहे. |
गुंतवणूक कुटुंबासाठी ठरेल फायदेशीर
निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक कुटुंबासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. गुंतवणूकदाराचे निधन झाल्यास म्युच्युअल फंडसह इतर मालमत्ता नॉमिनी अथवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर होते. त्यामुळे निवृत्तीनंतरही म्युच्युअल फंडमध्ये नियमित गुंतवणूक करायला हवी.