आरोग्य विमा हा सर्वांसाठी आवश्यक आहे. कधीही तुम्हाला दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही वैयक्तिक विमा काढण्याचा विचार करत असाल तर 18 वर्ष वय झाल्यापासूनच विमा पॉलिसी घ्यायला हवी. कमी वय असताना प्रिमियमही कमी भरावा लागतो तसेच प्री मेडिकल चेकअप करण्याची गरज पडण्याची शक्यता देखील कमी असते. जसे वय वाढत जाते तसे आरोग्याच्या समस्याही वाढत जातात. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमियम भरावा लागू शकतो.
कमी वय असताना आरोग्य विमा घेण्याचे फायदे
अल्प प्रिमियम -
तुमचे वय किती आहे यावर तुम्हाला किती प्रिमियम भरावा लागेल हे ठरत असते. तरुण वयात असताना आजारी पडण्याचा तसेच दुर्धर आजार होण्याच धोका कमी असतो. त्यामुळे विमा कंपनीवरही जबाबदारी कमी असते. त्यामुळे तुम्ही जर विशीत असताना विमा पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला अत्यल्प प्रिमियम भरावा लागेल.
वैद्यकीय चाचणीची गरज नाही-
जर तुम्ही तरुण वयात आरोग्य विमा घेत असाल तर तुम्हाला कोणताही आजार असण्याची शक्यता कमी असते. अनेक विमा कंपन्या पॉलिसी काढताना वैद्यकीय चाचणी करून घेतात. त्याद्वारे एखाद्या व्यक्तीची तंदुरूस्ती आणि आरोग्याची इत्थंभूत माहिती मिळते. जर काही शारीरिक व्याधी असल्याचे रक्त,लघवी किंवा इतर चाचण्यांतून समजले तर त्यानुसार तुम्हाला प्रिमियम आकारला जातो. कमी वय असल्याने विमा कंपन्या वैद्यकीय तपासण्याही घेत नाही. मात्र, जर वय ४५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर शक्यतो त्या व्यक्तीची आरोग्य चाचणी घेतली जाते.
वेटिंग पिरियडची चिंता नाही -
आरोग्य विमा खरेदी केल्यानंतर कंपनीकडून काही दिवसांचा वेटिंग पिरियड ठेवण्यात येतो. या प्रतिक्षा कालावधीमध्ये जर तुम्ही आजारी पडला तर तुम्हाला क्लेम करता येत नाही. कमी वयात आरोग्य विमा असेल तर प्रतिक्षा कालावधीत तुम्हाला विम्याची गरज पडण्याची शक्यता खुपच कमी असेत. याऊलट वयस्कर व्यक्तींना जास्त गरज असते. काही आजारांसाठी कंपनीकडून तीनपेक्षा जास्त महिन्यांचा वेटिंग पिरियड ठेवण्यात येतो. त्यामुळे कमी वयात जर तुम्ही विमा पॉलिसी खरेदी करत असाल तर तुम्हाला वेटिंग पिरियडची चिंता करण्याची गरज नाही.
नो क्लेम बोनस -
विमा पॉलिसी असतानाही त्या वर्षात जर तुम्ही एकही दावा केला नाही, म्हणजेच विमा पॉलिसीचा लाभ घेतला नाही तर तुम्हाला नो क्लेम बोनस देखील मिळतो. या बोनसने तुम्ही विम्याची एकूण रक्कम वाढवू शकता. तरुण वयात तुम्हाला विम्याची गरज पडण्याची शक्यता कमी असते. नो क्लेम बोनसद्वारे तुम्हाला प्रिमियमही कमी होऊ शकतो. वाढत्या वयानुसार विम्याची गरज जास्त भासते, त्यामुळे नो क्लेम बोनस मिळण्याची शक्यता कमी होते.
आर्थिक स्वातंत्र्य- विमा पॉलिसीद्वारे तुमचे वैद्यकीय खर्च भागवने, हा आरोग्य विम्याचा मूलभूत उपयोग आहे. आरोग्य विमा असेल तर तुम्हाला बचतीमधून पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही. ते पैसे तुम्ही भविष्यासाठी गुंतवू शकता. यामुळे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि तुम्ही सुरक्षितही राहाल. त्यामुळे विमा पॉलिसी तरुण वयातच काढलेले चांगले.