तुम्ही जर नवी कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. जवळपास सर्वच कार निर्मिती कंपन्यांनी विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. तसेच आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने विविध प्रकारची कर्जेही महाग झाली आहेत. जर तुमच्याकडे कार घेण्यासाठी मोठी रक्कम नसेल तर नक्कीच तुम्ही वाहन कर्ज काढण्याचा विचार करत असाल. मात्र, घाई न करता तुम्ही सारासार विचार करून कार घेण्याचे नियोजन केले पाहिजे. आता पैसे बचत करून भविष्यात कार घेण्याचा पर्यायही तुमच्याकडे आहे. मागील काही वर्षात कारचा मालक बननं ही गोष्ट जरा खर्चिक बनली आहे. त्यामुळे वाहन खरेदीचा निर्णय विचारपूर्वक करावा.
वाहन कर्ज घेण्याचा पर्याय
अल्प इएमआयच्या पर्यायांना भुलून जाऊन तुम्ही गरज नसताना महाग कार घेण्याची चूक अजिबात करू नका. जर तुम्हाला तत्काळ कार विकत घ्यायची असेल आणि तुम्ही कार लोन घेण्याचा विचार कर असाल तर तुम्हाला डाऊन पेमेंट करण्यासाठी काही रक्कम जवळ ठेवावी लागेल. समजा तुम्ही १० लाखांची कार विकत घेत आहात. तर तुम्हाला सुमारे दीड लाख रुपये डाऊन पेमेंट करण्यासाठी तरी लागतील. सर्व साधारणपणे कार लोन तीन ते पाच वर्षापर्यंत होते. जर तुम्ही साडेआठ लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला २० हजार रुपये महिना इएमआय भरावा लागू शकतो. कार इएमआय तुमच्या निव्वळ पगाराच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा या नियमानुसार तुम्ही निर्णय घेवू शकता.
कार ही अशी मालमत्ता आहे जी खरेदी केल्यानंतर तिचे मूल्य घसरत असते. ज्या वस्तूचे मूल्य कमी होत आहे त्यासाठी तुम्ही २० ते २५ टक्के व्याजदराने कर्ज घेता. तसेच गृह कर्ज घेताना तुम्हाला काही करविषय फायदे मिळतात. तसे वाहन कर्ज घेताना मिळत नाही. त्यामुळे सारासार विचार करुन निर्णय घ्या. सर्व बचत खर्च करुन कार कधीही विकत घेवू नका. काही पैसे आणीबाणीच्या काळासाठी जवळ ठेवा.
आधी बचत नंतर कार घेण्याचा पर्याय
जर तुम्हाला तत्काळ काळ घ्यायचीच असेल तर हा पर्याय तुमच्याकडे नाही. मात्र, जर काही दिवस थांबून तुम्ही कार घेऊ शकत असाल तर नक्कीच या पर्यायाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही आधी काही पैसे बचत करा आणि त्यानंतर कार घेण्याचा निर्णय फायद्याचा ठरू शकतो. समजा, तुम्हाला १० लाखांची कार विकत घ्यायची आहे. तुमच्याकडे २ लाख रुपये सेव्हिंग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही दरमहा २० ते २२ हजारापर्यंत रक्कम महिन्याला बचत करू शकता. तसेही तुम्ही कर्ज काढून कार घेतली असती तर तुम्हाला तेवढा इएमआय भरावा लागला असता.
त्या ऐवजी तुम्ही महिन्याला २५ हजार रुपयांची एसआयपी सुरु केली तर ३ वर्षानंतर सात टक्के दराने तुम्हाला १० लाख रुपये मिळतील. तसेच हेच पैसे जर तुम्ही चार वर्ष गुंतवले तर ८ टक्के व्याजदराने तुम्हाला १४ लाख रुपये मिळतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा ठेवून अंदाज लावलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर ३ वर्षापर्यंत जरी थांबलात तरी तुम्हाला कार घेण्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे जमा होतील आणि तुम्हाला कर्ज काढण्याची वेळ येणार नाही. यावर एक मध्यम मार्ग असा आहे की, तुम्हाला जी कार घ्यायची आहे त्या कारच्या किंमतीच्या निम्मी रक्कम तुम्ही बचत करा. त्यानंतर वाहन कर्ज काढून कार घ्या. असे केल्याने तुम्हाला कमी कर्ज घ्यावे लागेल त्याद्वारे तुम्हाला अधिकचे व्याजही भरावे लागणार नाही. तसेच दोन वर्ष जरी थांबलात तरी त्या काळात तुमचे वैयक्तिक उत्पन्न वाढून तुम्ही जास्त इएमआयही भरू शकता.