जर तुम्ही सेवा निवृत्त झाला असाल किंवा होणार असाल आणि तुम्हांला निवृत्तीनंतर जर पेन्शन मिळणार असेल तर हा प्रश्न तुम्हांला पडलाच असेल. आतापर्यंत तुमचा पगार तुमच्या सॅलरी खात्यावर येत होता, सेवानिवृत्तीनंतर येणारी पेन्शनची रक्कम कुठल्या खात्यात येईल? तुमचे सध्याचे सॅलरी खाते बंद करावे लागेल का? नव्याने पेन्शनसाठी खाते सुरु करावे लागेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखात आपण जाणून घेऊयात.
तुमचे सॅलरी खाते पेन्शन खात्यात रुपांतरीत करता येते हे लक्षात असू द्या. स्वतंत्र पेन्शन खाते सुरु करण्याची गरज नाहीये आणि त्यासाठी धावपळ करण्याची देखील गरज नाहीये. परंतु तुम्हांला यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागेल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
बँकेशी संपर्क साधा
ज्या बँकेत तुमचे सॅलरी खाते आहे त्या बँकेच्या ग्राहक सेवा कक्षाशी संपर्क साधा किंवा प्रक्रियेबद्दल अधिक सविस्तर चौकशी करण्यासाठी बँक शाखेला भेट द्या. प्रत्येक बँकेचे नियम आणि काम करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते हे लक्षात घ्या.
यासाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे तयार ठेवा. ज्यामध्ये तुमचे पेन्शन पत्र (Pension Letter), सरकारी ओळखपत्र (जसे की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड), पत्त्याचा पुरावा आणि बँकेला आवश्यक असलेली इतर कोणतीही कागदपत्रे असू शकतात.
आवश्यक अर्ज भरा
तुमच्या सॅलरी खात्याचे पेन्शन खात्यात रूपांतर करण्याची विनंती करणारा एक लेख अर्ज बँक व्यवस्थापकाच्या नावाने जमा करा आणि बँकेने सांगितलेला फॉर्म भरा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे द्या.
बँक तुमच्या कागदपत्रांचे आणि पेन्शन तपशीलांची तपासणी करेल आणि सर्व कागदपत्रे ठीक असल्यास तुम्हाला त्याबाबतची सूचना कळवली जाईल.
खाते रूपांतरण
एकदा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, बँक तुमचे वेतन खाते पेन्शन खात्यात रूपांतरित करेल. आवश्यक असल्यास ते तुम्हाला नवीन पासबुक, चेकबुक आणि डेबिट कार्ड जारी करतील. सर्वसाधारण प्रक्रियेत तुमचा बँक खाते क्रमांक बदलत नाही, त्यामुळे तुम्ही तुमचे जुने चेकबुक, पासबुक आणि डेबिट कार्ड वापरू शकता.
जर तुमची पेन्शन थेट सरकारद्वारे जमा केली जात असेल, तर तुमच्या खात्यातील बदलाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवा जेणेकरून ते त्यांचे रेकॉर्ड अपडेट करू शकतील आणि पेन्शन पेमेंट तुमच्या खात्यावर विना अडथळा जमा करू शकतील.
लक्षात ठेवा, तुम्ही ज्या बँकेशी व्यवहार करत आहात त्यानुसार त्यांचे नियम आणि प्रक्रिया बदलू शकतात. त्यामुळे तुमचे सॅलरी खाते असलेल्या बँकेत जाऊन प्रत्यक्ष तपशील जाणून घ्या, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि पेन्शन देखील वेळेवर जमा होईल.