Shirdi Sai Baba Temple: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या आहेत. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची मुदत आहे. त्याआधी नागरिक 2 हजाराच्या नोटांची विल्हेवाट वेगवेगळ्या प्रकारे लावत आहेत. डी मार्टमध्ये किराणा माल खरेदी करण्यापासून ते पेट्रोल पंपावर टाकी फुल्ल करण्यापर्यंत 2 हजाराच्या गुलाबी नोटांची चलती आहे. आता शिर्डीतील साई संस्थानातून एक बातमी समोर येत आहे. मागील महिन्याभरात भक्तांनी साईचरणी सुमारे अडीच कोटी रुपये दान केले आहेत.
सुमारे 12 हजार नोटा महिनाभरात जमा
नोटबंदी केल्यापासून नागरिकांना 2 हजार रुपयांची चिंता सतावू लागली आहे. बँकेत जाऊन ग्राहक अधिकृतपणे नोटा जमा किंवा बदलून घेऊ शकतात. (Shirdi saibaba temple trust charity) मात्र, नागरिक बाहेरच्या बाहेर नोटा खपवत असल्याचे दिसून येत आहे. अर्थात 30 सप्टेंबरपर्यंत आर्थिक व्यवहारांसाठी 2 हजारांची नोट वापरू शकतो. शिर्डी संस्थानातील विविध दान पेट्यांमध्ये मागील महिन्यात सुमारे 2 हजार रुपयांच्या 12,000 नोटा जमा झाल्या आहेत. एबीपी माझानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
गेल्या महिनाभरात दानपेटीत 2 हजारांच्या नोटांची संख्या वाढत आहे. दक्षिणा पेटीत 4 हजार तर देणगी काऊंटरवर 8 हजार नोटा प्राप्त झाल्याची माहिती साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली.
शिर्डी संस्थानामुळे परिसराचं अर्थकारण बदललं
अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी येथे दरवर्षी संपूर्ण भारतातून भक्त येतात. शिर्डी संस्थानामुळे परिसरातील संपूर्ण अर्थकारण बदललं आहे. (Shirdi saibaba temple trust) हिमाचल प्रदेश, उत्तरांखडपासून ते तमिळनाडूपर्यंत साईबाबांचे भक्त आहेत. शिर्डी शहर धार्मिक पर्यटनाचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. याचमुळे शिर्डीत विमानतळही उभारण्यात आले आहे. सेवा क्षेत्रातील बड्या कंपन्यांची हॉटेल्स शिर्डीत आहेत.
भक्तनिवास, हॉटेल, रेस्टॉरंट, गेस्ट रुम, दुकाने, ट्रव्हल यासह इतरही बाबतीत मोठी उलाढाल शिर्डीत होते. शिर्डीतील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही शिर्डीमध्ये मालमत्ता खरेदी केल्या आहेत. संस्थानातर्फे शाळा-महाविद्यालये, अन्नछत्रालय, रुग्णालये यासह इतरही कामांसाठी मिळालेल्या देणगीतून खर्च केला जातो.
2021-22 मधील साई संस्थानाचे उत्पन्न
2021-22 साली साई संस्थानाला देणगीसह विविध स्त्रोतांमधून मिळालेले उत्पन्न 436 कोटी रुपये होते. पैशांसोबत दागिने, वस्तुंच्या स्वरुपातही उत्पन्न संस्थानाला मिळते. मिळालेल्या देणगीपैकी विविध गोष्टींसाठी संस्थानाने 347 कोटी रुपये खर्च केला. यातून अनेक समाज उपयोगी कामेही करण्यात येतात. भक्तांसाठी प्रसाद आणि इतर सुविधा उभारण्यासाठीही मोठा खर्च होतो. उर्वरित रक्कम संस्थानामार्फत राष्ट्रीयकृत बँकात ठेवण्यात येते. तसेच सरकारी रोख्यांमध्येही गुंतवणूक करण्यात येते, अशी माहिती संस्थानाच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            