Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तेजीची आतिषबाजी! सेन्सेक्स 600 अंकांची झेप, गुंतवणूकदारांची 2 लाख कोटींची कमाई

Share Market Trading

दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर दिवाळी धुमधडाक्यात साजरी झाली. सोने खरेदीपासून घरांच्या खरेदीपर्यंत सर्वच क्षेत्रात मंदी ओसरल्याचे दिसून आले. त्याचा उत्साह शेअर बाजारात दिसून आला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी मोठी वाढ झाली. (Sensex-Nifty Sharp Rise Today)

नव्या वर्षात गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवला आहे. आज सोमवारी 31 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात तेजीची आतषबाजी दिसून आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने तब्बल 600 अंकांनी झेप घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 190 अंकांनी वधारला. तेजीच्या लाटेने गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटींची कमाई केली. (Sensex-Nifty Sharp Rise Today As Investor's rich by 2 trillion rupees)

शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांकडून तिमाही निकालांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. कंपन्यांच्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यातच दिवाळीत ग्राहकांनी केलेल्या बंपर खरेदीने अर्थव्यवस्थाला बुस्टर मिळाला आहे. दिवाळीच्या उत्साही वातावरणाने सर्वच क्षेत्रात सकारात्मकता निर्माण झाली आहे. दुचाकी आणि मोटार खरेदीच्या आकड्यांनी वाहन उत्पादक कंपन्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर दिवाळी धुमधडाक्यात साजरी झाली. सोने खरेदीपासून घर खरेदीपर्यंत सर्वच क्षेत्रात मंदी ओसरल्याचे दिसून आले.


दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने भारतावरील आयातीचा दबाव कमी झाला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात देशात महागाईचा पारा खाली येण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्ह आगामी पतधोरण बैठकीत व्याजदर दरवाढीबाबतची भूमिका सौम्य करेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्याचे पडसाद आज भारतासह आशियातील प्रमुख शेअर बाजारांत उमटले.

आज सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला. निफ्टीने 17,900 अंकांची पातळी ओलांडली होती.  दुपारी 12 वाजता सेन्सेक्स 716  अंकांनी वधारला असून तो 60,676.54 अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी 196.75 अंकांच्या तेजीसह 17,983.55 अंकांवर ट्रेड करत आहे.

आजच्या सत्रात ऑटो, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. बँकिंग, मायनिंग या क्षेत्रातील शेअर मात्र घसरले आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर वधारले आहेत. ज्यात टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचयूएल, एचसीएल टेक, डॉ. रेड्डी लॅब, पॉवर ग्रीड, टीसीएस, एलअॅंडटी, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स,  एशियन पेंट, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, टायटन या शेअरच्या किंमतीत वाढ झाली आहे. टाटा स्टील आणि एनटीपीसी या दोन शेअरचे भाव घसरले. 

याआधीच्या सत्रात म्हणजेच शुक्रवारी 28 ऑक्टोबर 2022 रोजी दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. सेन्सेक्स 203 अंकांनी तर निफ्टी 49 अंकांनी वधारला होता.  आज आशियातील जपान, चीनमधील शेअर निर्देशांक वधारले होते. 

IT आणि Auto शेअरला मागणी

निफ्टी मंचावर आयटी इंडेक्स 1.73% वधारला आहे. यात माइंड ट्री, एलअॅंडी इन्फोटेक, टेक महिंद्रा, इन्फोसिसि, एम्फसिस, विप्रो, टाटा एलएक्सी हे शेअर वधारले. त्याशिवाय निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये महिंद्रा अॅंड महिंद्रा, आयशर मोटर्स,  मारुती सुझुकी, अशोक लेलॅंड,  एस्कॉर्टस, टीव्हीएस मोटर्स, टाटा मोटर्स, बजाज ऑटो हे शेअर तेजीत आहेत.