शेअर मार्केटमध्ये आज मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी चौफेर खरेदीचा ट्रेंड दिसून आला. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाजारात तेजीची आतषबाजी झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1564 अंकांनी वधारला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 446 अंकांनी झेप घेतली. वर्ष 2022 मध्ये दुसऱ्यांदा सेन्सेक्स आणि निफ्टीत एकाच सत्रात मोठी झेप घेतली. बाजारातील तेजीने गुंतवणूकदारांना बाप्पा पावला. त्यांच्या मालमत्तेत आज 5.65 लाख कोटींची घसघशीत वाढ झाली. (Sensex Sharp Rise Today)
शेअर बाजारात सोमवारी मोठी पडझड झाली होती. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी महागाई नियंत्रणासाठी आणखी व्याजदर वाढवणार असल्याचे एका परिसंवादात म्हटले होते. त्यानंतर भारतासह आशियातील प्रमुख शेअर बाजारांचे निर्देशांक गडगडले होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून 561.22 कोटी काढून घेतले होते. आज मात्र नेमकी उलटी परिस्थिती दिसून आली. कालच्या सत्रात स्वस्त झालेल्या शेअर्सला आज मोठी मागणी होती.
आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, ऑटो, आयटी या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, इंड्सइंड बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील हे शेअर 3% ते 5% या दरम्यान वधारले. सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात आज वाढ झाली. बीएसई ऑटो 2.58%, बीएसई बँकेक्स 3.33%, बीएसई रियल्टी 3.51%, बीएसई पॉवर 2.82%, बीएसई आयटी 2.28% वधारले.आजच्या तेजीनंतर बीएसईवरील लिस्टेट कंपन्यांचे बाजार भांडवल 280.21 लाख कोटींपर्यंत वाढले आहे. सोमवारी अखेर ते 274.56 लाख कोटी इतके होते. आज कंपन्यांचे भांडवल 5.65 लाख कोटींने वाढले.
वर्ष 2022 मध्ये एकाच दिवसात इतकी मोठी वाढ नोंदवण्याची कामगिरी सेन्सेक्स आणि निफ्टीने दुसऱ्यांदा केली. ऑगस्ट महिन्यात निफ्टी 3.4% वाढला आहे. सेन्सेक्स 1,564.45 अंकांनी वधारुन 59,537.07 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 446.40 अंकांनी वधारला आणि तो 17,759.30 अंकांवर बंद झाला. चलन बाजारात डॉलरसमोर रुपयाचे मूल्य वधारले. रुपया आज 79.45 वर बंद झाला.
सोमवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज सकाळी आशियातील प्रमुख बाजार वधारले होते. युरोपात देखील आज शेअर बाजारात सकारात्मक ट्रेडिंग करत होते. कमॉडिटी मार्केटमध्ये आज कच्च्या तेलाचा भाव कमी झाला. क्रूडचा भाव 2.60% कमी झाला आणि तो प्रती बॅरल 102.52 डॉलर झाला.