Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर बाजार कोसळला, सलग दोन सत्रात सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची घसरण

Sensex Crash Today

Sensex Crash Today : मागील काही सत्रात तेजीने दौडणाऱ्या शेअर मार्केटमध्ये सध्या नफावसुलीचा ट्रेंड सुरु आहे. आज सोमवारी 22 ऑगस्ट 2022 रोजी बाजार खुला होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

शेअर मार्केटमध्ये नफावसुलीने जोर धरला असून आज सोमवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली. (Sensex and Nifty Crash Today In Morning Session) मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 650 अंकांनी कोसळला असून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत  200 अंकांनी कोसळला आहे. सलग दोन सत्रात झालेल्या मोठ्या पडझडीने गुंतवणूकदारांना जबर फटका बसला आहे. शुक्रवार आणि सोमवार अशा दोन सत्रात सेन्सेक्समध्ये जवळपास 1200 अंकांची घसरण झाली.

आजच्या सत्रात बँका, फार्मा, रियल्टी, ऑटो, आयटी, एफएमसीजी या सेक्टरमध्ये नफेखोरांनी चौफेर विक्री सुरु केली आहे. सेन्सेक्स मंचावरील 30 शेअरपैकी 24 शेअरमध्ये घसरण झाली. ज्यात नेस्ले, एशियन पेंट, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एलअॅंडटी, भारती एअरटेल, मारुती. टाटा स्टील, विप्रो, कोटक बँक, टेक महिंद्रा, एसबीआय, एचडीएफसी, आयटीसी, इन्फोसिस, अॅक्सिस बँक या शेअरमध्ये घसरण झाली. रिलायन्स, एचयूएल, पॉवरग्रीड, रिलायन्स , आयटीसी हे शेअर वधारले आहेत.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी मंचावर निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी मेटल , निफ्टी मिडिया, निफ्टी फार्मा, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी रियल्टी या सेक्टर इंडेक्समध्ये घसरण झाली आहे. निफ्टीवर वोडाफोन, टाटा स्टील, ओएनजीसी, गेल, पीएनबी बँक, एचपीसीएल, चंबळ फर्टिलायझर, हॅटसन अॅग्रो, लेमन ट्री हॉटेल, जुबिलंट फूडवर्क्स, इंडियन एनर्जी एक्सचेंज, ट्युब इन्व्हेस्टमेंट या शेअरमध्ये घसरण झाली.

यापूर्वी शुक्रवारी  19 ऑगस्ट 2022 रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली होती. शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स 652 अंकांनी कोसळला होता. निफ्टीत 1% घसरण झाली होती. आजच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 59 हजार अंकांखाली आला आहे. निफ्टी 17600 अंकांच्या पातळीखाली आहे. निफ्टी 17500 ते 17550 या दरम्यान राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आज 22 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12 वाजता सेन्सेक्स 626 अंकांनी कोसळला असून तो 59079 अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी 188 अंकांनी घसरला असून 17570 अंकांवर आहे.

रुपयाला बसली झळ (Rupee Start on Negative Note)

शेअर मार्केटमध्ये सुरु असलेल्या घसरणीचा मोठा फटका रुपयाला बसला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 79.81 वर खुला झाला. शुक्रवारी देखील डॉलरसमोर रुपयामध्ये २० पैशांचे अवमूल्यन झाले होते. तो 79.84 वर स्थिरावला होता. आज त्याने नकारात्मक सुरुवात केली. शेअर मार्केटमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून चौफेर विक्री केली जात आहे. यामुळे बाजारात डॉलर मजबूत झाल्याचे चलन बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. डॉलर इंडेक्स 108 वर गेला असून यूएस 10 वर्षांचा बॉंड यिल्ड 2.99% गेला आहे.

पेटीएमचा शेअर तेजीत (Paytm Share Rise)

शेअर मार्केटमध्ये जोरदार विक्री सुरु असली तरी पेटीएमचा शेअर मात्र तेजीत आहे. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशनच्या शेअरमध्ये आज सकाळच्या सत्रात 2.79% वाढ झाली. वन 97 कम्युनिकेशनचा शेअर 793.65 वर पोहोचला. नुकताच वन 97 कम्युनिकेशनच्या शेअर होल्डर्सनी विजय शेखर शर्मा यांना पेटीएमचे पुन्हा नेतृत्व करण्याची संधी दिली. विजय शेखर शर्मा यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी म्हणून फेर निवड करण्यात आली आहे. या घडामोडीचे पडसाद आज वन 97 कम्युनिकेशनच्या शेअरवर उमटले. विजय शेखर शर्मा यांची केवळ फेरनियुक्तीला शेअर होल्डर्सने मंजुरी दिली नाही तर त्यांच्या वार्षिक 4 कोटी रुपयांच्या भरघोस वेतनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.