रिझर्व्ह बँकेचा ताजा अहवाल आणि चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक यामुळे पुन्हा लॉकडाऊनचे संकट अशा कारणांनी धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज गुरुवारी शेअर बाजारात चौफेर विक्रीचा पावित्रा कायम ठेवला. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 110 अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे.
आज बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 300 अंकांची भरारी घेतली होती. आशियातील सकारात्मक संकेतांनी गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही. बाजारात पुन्हा नफावसुली सुरु झाली. आजच्या सत्रात सार्वजनिक बँका, फार्मा या क्षेत्रात तेजी आहे तर बँका, ऑटो, ऑइल अॅंड गॅस, स्मॉल कॅप, एनर्जी, एफएमसीजी, आयटी या क्षेत्रात घसरण झाली आहे.
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे जगभर भीतीचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचे पडसाद आज शेअर मार्केटमध्ये उमटले. आज फार्मा कंपन्यांचे शेअर तेजीत आहे. अल्केम, अॅबोट इंडिया, सन फार्मा, ग्लॅंड, टोरंट फार्मा, लुपिन हे शेअर वधारले आहेत.
सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 26 शेअरमध्ये घसरण झाली आहे. यात एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, डॉ. रेड्डी लॅब, एचसीएल टेक्नॉलॉजी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एचयूएल, आयसीआयसीआय बँक, टायटन, टीसीएस, विप्रो, टाटा स्टील, नेस्ले, मारुती सुझुकी या शेअरमध्ये घसरण झाली आहे. भारती एअरटेल, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा हे चार शेअर तेजीत आहेत.
सध्या दुपारी 12.30 वाजता मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 60768 अंकांवर ट्रेड करत असून त्यात 298.12 अंकांची घसरण झाली आहे. निफ्टी 90.95 अंकांच्या घसरणीसह 18111.30 अंकांवर व्यवहार करत आहे. कालच्या सत्रात बुधवारी सेन्सेक्समध्ये 635 अंकांची घसरण झाली होती. तो 61067 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी 18200 अंकांच्या पातळीवर स्थिरावला होता. कालच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयात 14 पैशांचे अवमूल्यन झाले होते. तो 82.84 वर बंद झाला होता.