Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI Penalty on 5 entities : चुकीचा व्यवहार करणाऱ्या 5 संस्थांना सेबीकडून दंड, एकावर तर 6 महिन्यांची बंदी

SEBI Penalty on 5 entities : चुकीचा व्यवहार करणाऱ्या 5 संस्थांना सेबीकडून दंड, एकावर तर 6 महिन्यांची बंदी

SEBI Penalty on 5 entities : चुकीच्या पद्धतीनं ट्रेडिंग करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचा धडाका सेबीनं लावलाय. अलिकडेच 7 संस्थांना सेबीनं दंड ठोठावला होता. आता नव्यानं आणखी 5 संस्थांवर अयोग्य व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. शिवाय एका संस्थेवर तर 6 महिन्यांची बंदीदेखील घातलीय.

बाजारात विविध संस्थामार्फत चुकीचे व्यवहार (Wrong trading) केले जात असल्याचं निदर्शनास आलंय. भांडवली बाजार नियामक सेबीनं (Securities and Exchange Board of India) आता अशा संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केलीय. चुकीचे व्यवहार करणाऱ्या एकूण 5 संस्था आहेत. त्यांना 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधल्या (Bombay stock exchange) ई-लिक्विड स्टॉक ऑप्शन्स या सेगमेंटमध्ये अत्यंत चुकीचे व्यवहार केल्याबद्दल या संस्थांना दंड केला आहे. बीक्यू प्राइमनं सविस्तर वृत्त दिलंय. चित्राबाई वसंतराव निकम, दमयंती झुनझुनवाला, नेमीचंद कस्तुरचंद जैन, नरेश कुमार अग्रवाल आणि चंद्र लक्ष्मी सेफ्टी ग्लास लिमिटेड (CLSG) यांचा या कारवाईमध्ये समावेश आहे. सेबीनं या प्रत्येकांना 5-5 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

ई-लिक्विड स्टॉक ऑप्शन्समधल्या व्यवहारांची तपासणी

सेबीनं बीएसईवरच्या (BSE) ई-लिक्विड स्टॉक ऑप्शन्समधल्या व्यवहारांची तपासणी केली. यात मोठ्या प्रमाणावर उलटसुलट व्यवहार झाल्याचं तपासात स्पष्ट झालं. यामुळे एक्स्चेंजमध्ये आर्टिफिशिअल व्हॉल्यूम्सला प्रोत्साहन मिळालं. एप्रिल 2014 ते सप्टेंबर 2015 या कालावधीत नियामकाने या विभागाशी संबंधित काही संस्थांच्या एकूणच व्यापारविषयक घडामोडींची तपासणी केली. त्यात हे 5 लोक किंवा संस्था या उलटसुलट व्यवहारात गुंतल्याचं सेबीला आढळलं. त्यानंतर प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिव्हर्सल ट्रेडचं एकूणच स्वरूप कथितरित्या अयोग्य आहे. मात्र तरीदेखील सामान्य व्यवहाराप्रमाणे ते चालवले गेले आहेत. आर्टिफिशिअल व्हॉल्यूममध्ये ट्रेडिंग करताना ते खोटे आणि दिशाभूल करणारे स्वरूप तयार करतात, असं सेबीनं सांगितलं.

नियमांचं उल्लंघन - 6 महिन्यांची बंदी

या 5 जणांनी केलेले व्यवहार हे पीएफयूटीपी (Fraudulent and Unfair Trade Practices prohibition) नियमांचं उल्लंघन असल्याचं सेबीनं म्हटलं. यासोबतच आणखी एक मोठी कारवाई सेबीनं केलीय. उदय इंटेलिकॉल प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर सिक्युरिटीज मार्केटमधून 6 महिन्यांसाठी बंदी घातलीय. ही कंपनी अनधिकृत गुंतवणुकीचा सल्ला देत होती, असं सेबीनं सांगितलंय. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. पुढच्या 3 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं परत केले जावेत, असा आदेश सेबीनं काढलाय. रजत सराफ आणि कल्पना जैन हे या कंपनीचे संचालक होते.

कंपनी नोंदणीकृत नाही

सेबीच्या म्हणण्यानुसार, उदय इंटेलिकॉल गुंतवणूक सल्लागार सेवा पुरवते. मात्र कंपनीकडे आवश्यक प्रमाणपत्रे नव्हती. ही कंपनी सेबीकडे नोंदणीकृतदेखील नाही. सराफ आणि जैन हे कंपनीचे संचालक तसंच कंपनीचे भागधारक असल्याचं सेबीनं म्हटलंय. हे दोन्ही लोक कंपनीनं दिलेल्या सल्ल्याचा फायदा घेऊन पैसे कमवत होते. मात्र हे गुंतवणूक सल्लागार (IA) नियमांचं उल्लंघन आहे. मार्च 2018पासून आतापर्यंत कंपनीनं अनधिकृत गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून 1.06 कोटी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती सेबीनं दिली. दरम्यान, अशाचप्रकारची कारवाई सेबीनं मागच्या महिन्यात केली होती. जवळपास 7 संस्थांचे व्यवहार संशयास्पद आढळून आले होते. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.