रशिया-युक्रेन युद्ध, महागाईचा भडका, सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ यामुळे मागील वर्ष शेअर मार्केट्ससाठी खूपच आव्हानात्मक गेले. याची झळ शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांना बसली. वर्ष 2022-23 मध्ये तब्बल 342 म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न्स दिल्याची धक्कादायक माहिती सेबीच्या अहवालात समोर आली आहे.
शेअर मार्केट नियंत्रक सेबीचा वर्ष 2022-23 चा वार्षिक अहवाल नुकताच जाहीर झाला. ज्यात म्युच्युअल फंडांच्या कामगिरीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात सुमार कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांची संख्या वाढल्याचे सेबीच्या निर्दशनात आले आहे. वर्ष 2021-22 च्या तुलनेत 2022-23मध्ये निगेटिव्ह रिटर्न देणाऱ्या फंड योजनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्ष 2021-22 मध्ये निगेटिव्ह रिटर्न देणाऱ्या योजनांची संख्या अवघी 60 होती.
गेल्या आर्थिक वर्षात 595 म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना काही प्रमाणात रिटर्न दिले. मात्र परतावा देणाऱ्या या योजनांची संख्या त्याआधीच्या वर्षाच्या तुलेनत कमी आहे. वर्ष 2021-22 मध्ये 898 योजनांनी गुंतवणूकदारांना परतावा दिला होता.
म्युच्युअल फंड योजनांची सुमार कामगिरी सुरु असतानाच शेअर निर्देशांकांची मात्र दमदार वाटचाल सुरु होती. सेबीच्या वार्षिक अहवालानुसार आर्थिक वर्ष 2022 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी सरासरी 17% ने वाढले. याच वर्षात 60 म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिला.
वर्ष 2022-23 मध्ये 56 म्युच्युअल फंड योजनांनी 10% हून अधिक रिटर्न दिला. 286 म्युच्युअल फंड योजनांनी 0 ते 10% रिटर्न दिल्याचे सेबीने म्हटले आहे.
नव्या म्युच्युअल फंड योजनांची संख्या वाढली
वर्ष 2022-23 मध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी 361 नवीन फंड योजना सादर केल्या. यामध्ये आधीच्या वर्षाच्या तुलेनत वाढ झाली. यात 275 योजना ओपन एंडेड होत्या तर 86 योजना क्लोज एंडेड प्रकारातील म्युच्युअल फंड होते. त्याआधीच्या वर्षात 2021-22 मध्ये 183 म्युच्युअल फंड योजना लॉंच करण्यात आल्या होत्या. 12 हायब्रीड म्युच्युअल फंड लॉंच करण्यात आले.