Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI action: सेबीची मोठी कारवाई! नवे ग्राहक तयार करण्यास 'या' कंपनीवर 2 वर्षांसाठी बंदी

SEBI action: सेबीची मोठी कारवाई! नवे ग्राहक तयार करण्यास 'या' कंपनीवर 2 वर्षांसाठी बंदी

SEBI action: भांडवली बाजार नियामक सेबीनं आणखी एका कंपनीवर कारवाई केली आहे. बाजारात अयोग्य पद्धतीनं आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर मागच्या काही दिवसांपासून सेबीनं कठोर पवित्रा घेतला आहे. त्यात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे.

सेबीनं आयआयएफएल सिक्युरिटीजवर कारवाई केली आहे. एवढंच नाही तर 2 वर्षांसाठी बंदीदेखील घातली आहे. भांडवली बाजार नियामक सेबीनं ब्रोकरेज हाऊस आयआयएफएलवर मोठी कारवाई केली आहे. ही कंपनी पूर्वी इंडिया इन्फोलाइन लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. ग्राहकांच्या निधीचा गैरवापर होत असल्याच्या कारणावरून सेबीनं (Securities Exchange Board of India) ही कारवाई केली आहे.

आता नवे क्लायंट्स नाहीत

सेबीनं काढलेल्या नव्या आदेशानुसार कंपनी आता पुढच्या 2 वर्षांसाठी नवीन क्लायंट तयार करणार नाही. सेबीच्या आदेशानुसार, आयआयएफएल या ब्रोकरेज कंपनीनं आपल्या ग्राहकांच्या निधीचा गैरवापर केला. त्यामुळेच सेबीनं कंपनीवर बंदीचा हा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2011 ते जानेवारी 2017 या दरम्यानचं हे प्रकरण आहे. दरम्यान, आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे. कंपनीचा शेअर आजच्या व्यवहारात 18 टक्क्यांनी घसरून 57.50 रुपयांवर आला. तर सोमवारी तो 71.20 रुपयांवर बंद झाला होता.

क्रेडिट बॅलन्स क्लायंटचा निधी वापरला

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) एप्रिल 2011 ते जानेवारी 2017 या दरम्यान आयआयएफएल सिक्युरिटीजच्या खात्यांची तपासणी केली. त्यानंतर सेबीनं हा आदेश जारी केला आहे. आयआयएफएलनं त्यांच्या क्रेडिट बॅलन्स क्लायंटचा निधी वापरला होता, असं सेबीला तपासणीत आढळून आलं होतं.

ग्राहकांचा निधी वापरला

कंपनीनं हा निधी आपल्या प्रॉपरायटरी ट्रेड्सच्या सेटलमेंटसाठी वापरला होता. याशिवाय हा निधी डेबिट बॅलन्स क्लायंट्सच्या ट्रेडसाठीही वापरला जात होता. एप्रिल 2011 ते जून 2014 दरम्यान निधी वापरण्यात आला होता. याशिवाय मार्च 2017 मध्येही उल्लंघनाची प्रकरणं समोर आल्याचं सेबीनं सांगितलं आहे.

उलटसुलट व्यवहार

डेबिट बॅलन्स क्लायंटचे व्यवहार क्रेडिट बॅलन्स क्लायंटसाठी वापरले जात होते, असं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलं आहे. कंपनीनं हे काम 809 ट्रेडिंग दिवसांपैकी 795 दिवसांमध्ये केलं. सेबीनं 1 एप्रिल 2011 ते 30 जून 2014 या कालावधीत या खात्यांची तपासणी केली. दरम्यान, आयआयएफएल कंपनीनं मालकीच्या व्यवहारांमध्ये क्रेडिट शिल्लक असलेल्या ग्राहकांच्या निधीचा वापर केला. या ब्रोकरेज कंपनीनं एप्रिल 2011 ते जून 2014 दरम्यान 42 ट्रेडिंग सत्रांमध्ये हे सर्व व्यवहार केले. दरम्यान, कंपनीनंदेखील एक स्टेटमेंट काढून आपली बाजू स्पष्ट केली आहे. असलेल्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. तसंच या आदेशाविरोधात अपील करणार असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

आधीही झाली होती कारवाई

क्रेडिट बॅलन्स क्लायंटच्या कायदेशीर हिताच्या दृष्टीनं आयआयएफएल कंपनीनं चुकीची कृती केली, असं सेबीनं म्हटलं आहे. केवळ कंपनीलाच नाही तर डेबिट बॅलन्स क्लायंटलाही यामुळे फायदा झाला आहे. त्यामुळे सेबीनं पुढच्या 2 वर्षांसाठी आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड या कंपनीमध्ये नवीन क्लायंट न जोडण्याचा निर्णय घेतला आहे. मे 2022मध्ये भांडवली बाजार नियामकानं ब्रोकरेज कंपनी आयआयएफएल सिक्युरिटीजवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.