रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरामध्ये 250 बेसिस पॉईंटने वाढ केल्यानंतर अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी कर्जावरील व्याजदरासोबतच एफडी (FD) वरील व्याजदरात ही वाढ केली आहे. तसेच पोस्ट ऑफिसमधील अनेक योजनांच्या व्याजदरात ही सरकारने वाढ केली. जर तुम्ही देखील आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर सध्या एफडी आणि पोस्ट ऑफिसमधील टर्म डिपॉझिट योजनेवर (TD) सध्या किती व्याजदर मिळत आहे. त्याचा कालावधी काय किंवा त्यात गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदाराला टॅक्समध्ये काही सवलत मिळते का? याबाबत जाणून घेणार आहोत.
भारतातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)द्वारे केल्या जाणाऱ्या मुदत ठेवी (Fixed Deposit-FD)मध्ये मिळणारे फायदे आणि पोस्ट ऑफिसमधील टर्म डिपॉझिट (TD) योजनेत मिळणारे फायदे यामध्ये नेमका फरक काय? कुठे गुंतवणूक केली तर फायद्याची ठरू शकते. हे समजून घेणार आहोत.
गुंतवणूक कालावधी किती?
एसबीआयच्या एफडीमध्ये (SBI Bank FD) जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. हा कालावधी तुम्ही निश्चित करून गुंतवणूक करू शकता. तर पोस्ट ऑफिसमधील टर्म डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करण्याचा कालावधी हा 1, 2, 3 आणि 5 वर्ष असा अनुक्रमे निश्चित करण्यात आला आहे.
व्याजदर किती मिळतो?
सर्वसामान्य लोकांना एसबीआय बँकेतील एफडीमध्ये 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणुकीवर 3 ते 7.5 % व्याजदर दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) 0.5 % अतिरिक्त व्याजदर दिला जात आहे. बँकेने खास ग्राहकांसाठी सुरु केलेल्या अमृत कलश योजनेमध्ये (Amrit Kalash Deposit Scheme) 7.6% व्याजदर दिला जात आहे.
पोस्ट ऑफिसमधील टर्म डिपॉझिट योजनेच्या अंतर्गत एक वर्षाच्या गुंतवणुकीवर 6.8% व्याज, दोन वर्षाच्या गुंतवणुकीवर 6.9% , तीन वर्षाच्या गुंतवणुकीवर 7% आणि पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.5 % व्याजदर दिले जात आहे.
कर सवलत मिळते का?
एसीबीआय बँकेतील एफडी (SBI Bank FD) आणि पोस्टातील टर्म डिपॉझिट (TD) या दोन्ही योजनेतील गुंतवणुकीवर ग्राहकांना कर सवलत (Tax Benefit) मिळते. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत ग्राहकांना टॅक्स बेनिफिटचा लाभ घेता येतो.
(डिसक्लेमर: 'महामनी' कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. वाचकांनी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)
Source: hindi.moneycontrol.com