परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी खूप मोठा खर्च येतो. मात्र,उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी समाजकल्ल्याण विभागाकडून वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देण्यात येतात. त्याच प्रमाणे राज्यातील मराठा राज्यातील मराठा, कुणबी या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती (Scholarship) जाहीर करण्यात आली आहे. सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती (sayajirao gaikwad Sarathi Scholarship) असे या शिष्यवृत्ती योजनेचे नाव आहे. या योजनेतून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना-
राज्यातील मराठा,(Maratha) कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबी या समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी(SARATHI) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही. मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही पदव्युत्तर व पीएच.डी.चे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव ‘सारथी’कडून देण्यात आला होता. अखेर 4 जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाने सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
शिष्यवृत्ती योजनेचे स्वरुप
याजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्तीची ही योजना 2023-24 पासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सारथी संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतील. या साठी परदेशात अभियांत्रिकी, स्थापत्यकला, मॅनजमेंट,विज्ञान, वाणिज्य-अर्थशास्त्र, विधी, औषध निर्माण या विविध अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामध्ये पदव्युत्तर, पदवी, पदविका अभ्यासासाठी 50 आणि डॉक्टरेटसाठी 25 अशा एकूण 75 विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल.या शिष्यवृत्ती योजनेसाठी 5 वर्षाकरिता 275 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, वर्ष 2023-24 साठी राज्य शासनाने 25 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. या शिष्यवृत्तीसाठी QS World Rankings मध्ये 200 पर्यंतचे मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था अथवा विद्यापीठांमध्ये अॅडमिशन घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.
दोन वर्षापासून प्रंलबित होती मागणी-
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी यासाठी मागणी 2 वर्षापासून प्रलंबित होती. यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीच 50 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यावर कार्यवाही झालेली नव्हती.