Saving Formula: महिन्यातील 1 ते 10 तारखेपर्यंत पगार झाला की सगळ्यांना सुखाचे दिवस आल्यासारखे वाटते आणि महिन्याची 20 तारीख उलटून गेली की, महिना कधी संपतोय आणि पगार कधी होतो. याची वाट पाहू लागतात. कारण पगार कितीही असला तरी तो शेवटच्या महिन्यापर्यंत पुरतच नाही. अशी अनेक जणांची तक्रार असते. त्यामुळे सेव्हिंग (बचत) कशी करणार हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो. तर आज आम्ही तुमच्यासाठी असा एक सेव्हिंग फॉर्म्युला घेऊन आलो आहोत. जो तुमचा खर्च मॅनेज करेल आणि तुमची बचत देखील होईल.
पगारदार व्यक्तींना संपूर्ण महिन्याचा खर्च लक्षात ठेवून त्यानुसार पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे पगार हातात आला की, पहिले खर्च आठवतात. हे खर्च महत्त्वाचे आहेतच. पण त्याचबरोबर बचत देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण एखाद्या महिन्यात पगार वेळेवर नाही आला तर बचतीतील पैसे किमान वापरता येऊ शकतात. त्यामुळे तुमची देखील अशीच अडचण असेल तर आज आपण असा एक फॉर्म्युला जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुमचे घरचे बजेट व्यवस्थित सेट होण्यास मदत होईल आणि ज्यातून तुमची बचत सुद्धा होईल. तर आज आपण 50-30-20 या फॉर्म्युलाचा आधार घेऊन तुमच्या पगाराचे आणि खर्चाचे बजेट तयार करणार आहोत.
आवश्यक खर्चासाठी 50 टक्के पगार बाजुला ठेवा
आर्थिक गुंतवणुकीतील वेगवेगळ्या थिअरींपैकी 50-30-20 हा एक असा सक्सेसफुल फॉर्म्युला आहे. ज्यामुळे अनेकांचे बजेट योग्यप्रकारे सेट झाले आहे. तर प्रत्येक पगारदार व्यक्तीला महिन्याच्या सुरूवातील 1 ते 10 या तारखेपर्यंत पगार मिळतो. काहींना महिन्याच्या शेवटी मिळत असेल. तर जेव्हा केव्हा तुमच्या बँक खात्यात पगार जमा होईल. तेव्हा त्यातील 50 टक्के रक्कम कुटुंबातील महत्त्वाच्या खर्चासाठी बाजुला काढून ठेवा. ज्यामध्ये घराचे भाडे किंवा होमलोनचा हप्ता, किराणा सामानाचा खर्च, विविध प्रकारची बिले यांचा समावेश असू शकतो. हे खर्च असे आहेत; जे तुम्ही टाळू शकत नाही. त्यामुळे हा खर्च भागवण्यासाठी पगारातील 50 टक्के हिस्सा यासाठी बाजुला काढून ठेवा.
30 टक्के खर्च कुटुंबाच्या आवडीवर खर्च करा
महत्त्वाचे खर्च भागवण्यासाठी पगारातल 50 टक्के हिस्सा बाजुला काढून ठेवल्यानंतर आता उरलेल्या 50 टक्के पगारातील 30 टक्के हिस्सा हा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आवडी-निवडीसाठी बाजुला काढून ठेवा. जसे की, कुटुंबासोबत बाहेर फिरण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी किंवा एकत्रित हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्यासाठी किंवा मोबाईल विकत घेण्यासाठी वापरू शकता. या गोष्टींसाठी पगारातील 30 टक्के रक्कम वापरा. ही 30 टक्के रक्कम वापरताना तुम्ही प्रत्येक महिन्याला याचा प्राधान्य क्रम बदलू शकता, म्हणजे या महिन्यात मोबाईल विकत घेतला असेल तर, पुढील महिन्यात बाहेर फिरण्यासाठी जा, असे बदल करू शकता.
पगारातील 20 टक्के रक्कम यासाठी वापरा
50-30-20 या फॉर्म्युलानुसार पगारातील 50 टक्के आणि 30 टक्के रक्कम कशासाठी वापरायची हे तर तुम्हाला आता बऱ्यापैकी कळले आहे. पण आता उर्वरित 20 टक्के रक्कम तुम्हाला खूप जबाबदारीने योग्य ठिकाणी गुंतवायची आहे. या 20 टक्क्याच्या फॉर्म्युलामध्ये कुठेही कपात होता कामा नये. हा नियम तुम्ही स्वत:लाच घालून घेतला पाहिजे. तसेच ही गुंतवणूक करताना एकाच योजनेत न करता वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनेत करा. जेणेकरून तुम्हाला त्याचा वैविध्यपूर्ण फायदा मिळेल आणि भविष्यात तुमच्या गुंतवणुकीत टप्प्याटप्प्याने वाढ होत राहील.
अशाप्रकारे तुम्ही जर तुमच्या पगाराच्या खर्चाचा फॉर्म्युला केला तर मला नक्की विश्वास आहे की, तुमचे बजेट ही व्यवस्थित होण्यास तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमची पगाराच्या दिवसाची वाट पाहण्याची व्यथा आपोआप संपून जाईल. त्यामुळे पगार काय किंवा कोणतीही रक्कम किंवा उत्पन्न तुमच्या हाती आले की, त्याचा 50-30-20 या फॉर्म्युलानुसार विचार करा आणि टेन्शनमधून मुक्त व्हा.