आपलं स्वतःचं घर बांधावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आपल्या स्वप्नातलं घर साकारताना कितीतरी विचार आपण केलेला असतो. सगळं काही आपल्या मनासारखं होईल असं होत नाही. आर्थिक अडचणी हे यातलं मुख्य कारण. वाढत्या महागाईचा विचार केला तर आपल्याला हातचं राखूनच खर्च करावा लागतो. हौसेला मोल नाही असं म्हणतात खरं, पण हौस करण्यासाठी आपल्याकडे पैसे असायला हवेत हे देखील तितकंच खरं. अनेकदा मध्यमवर्गीय कुटुंबाला घर बांधताना निरनिराळ्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु वेळेत पैशाचं आणि बांधकामांचं नियोजन केल्यास ही समस्या बहुतांशी दूर होऊ शकते, हे मात्र खरं.
या लेखात आम्ही अशाच काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्या तुम्हांला बांधकाम करताना उपयोगी पडणार आहेत. चला तर जाणून घेऊयात अतिशय साध्या सोप्या अशा गोष्टी ज्या तुमची मोठी बचत करू शकतील.
Table of contents [Show]
पूर्व नियोजन आवश्यक
घराचं बांधकाम करताना सगळ्यांत आवश्यक गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे नियोजन. घर बांधण्यापूर्वी हे नियोजन व्हायला हवं. तुम्हांला नेमकं कसं घर बांधायचं आहे, त्यात काय काय असलं पाहिजे, किती खोल्या असल्या पाहिजेत, कोणत्या दिशेला काय असेल या सगळ्या गोष्टी आधीच ठरवून घ्या. दुसऱ्या टप्प्यात तुमच्या योजना प्रत्यक्षात आणता येतील का याची चर्चा करता येईल. परंतु आधीच आपल्याला काय हवं काय नको याची कल्पना असली की काम करायला, आर्थिक नियोजन करायला सोपं जातं. एक सुनियोजित बांधकाम प्रकल्प तुमचा वेळ आणि पैसा वाचवू शकतो हे कायम लक्षात ठेवा. बांधकाम सुरू करण्यापूर्वी आपल्या प्रकल्पाच्या सर्व तपशीलांची योजना सुनिश्चित करायला विसरू नका.
गुणवत्तापूर्ण बांधकाम साहित्य खरेदी करा
पैसे वाचवायचे आहेत म्हणून कमी किंमतीत साधारण साहित्य खरेदी करू नका. हे बांधकामाच्यावेळी स्वस्त वाटेल परंतु याचा दीर्घकालीन विचार केल्यास तुम्हांला हे महागात पडू शकते. बांधकामात काही त्रुटी राहिल्या तर काही वर्षांनी पुन्हा तुम्हांला बांधकाम करावे लागेल, त्यामुळे तुमचा आताचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाऊ शकतात. या सर्व गोष्टींचा विचार करता गुणवत्तापूर्ण बांधकाम साहित्य खरेदी करा.
अनुभवी लोकांची निवड करा
आर्किटेक्ट, अभियंते आणि कंत्राटदार निवडताना त्यांचा कामाचा अनुभव लक्षात घ्या. अनुभवी आर्किटेक्ट, इंजिनिअर कामावर घेतल्याने तुम्हाला खर्च वाचविण्यात मदत होऊ शकते. हे सर्व अनुभवी लोक तुमच्या बांधकाम प्रकल्पात वापरण्यासाठी आवश्यक असलेले सर्वोत्तम साहित्य, पद्धती आणि तंत्रांबद्दल तुम्हांला मौल्यवान सल्ला देऊ शकतात.
जागेचा नियोजनपूर्वक वापर करा
तुम्ही ज्या जागेवर बांधकाम करणार आहात त्या जागेचा तुम्ही कसा वापर करणार आहात हे आधी ठरवून घ्या. जागेनुसार बांधकाम केल्यास तुमचा बांधकाम खर्च वाचवता येऊ शकतो. जजागेचा नियोजनपूर्वक विचार केला तर अनावश्यक बांधकाम टाळता येऊ शकते. जितकी जागा आहे, तेवढ्या संपूर्ण जागेत बांधकाम केलंच पाहिजे असं नाही. आपली आवश्यकता आणि जागेची अनुकूलता या दोन्ही गोष्टींची सांगड घालणे आवश्यक आहे.
प्री-फॅब्रिकेटेड मटेरिअल वापरा
प्रीफॅब्रिकेटेड मटेरिअल बांधकाम प्रक्रियेदरम्यान तुमचा वेळ आणि पैसा वाचवू शकतात. हे साहित्य प्री-कट (आधीच वापरण्यायोग्य बनवलेले) आणि प्री-डिझाइन केलेले असते, ज्यामुळे ऑन-साइट श्रमाचे प्रमाण कमी होते आणि अर्थातच पैसे देखील वाचतात.
पारंपरिक उर्जा स्त्रोतांचा विचार करा
सौर किंवा पवन उर्जा सारख्या पारंपरिक उर्जा स्त्रोतांचा वापर केल्यास तुम्हांला नक्की फायदा होईल. बांधकाम करताना याचा विचार करावाच परंतु ते शक्य नसल्यास घर बांधून झाल्यानंतर त्यात पारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरून वीज निर्मिती करणारे संयंत्र जरूर बसवून घ्या, यामुळे भविष्यात तुमची बचतच होईल.
बांधकामानंतर अनावश्यक बदल टाळा
बांधकाम झाल्यानंतर किंवा बांधकामादरम्यान केलेले बदल तुम्हांला महागात पडू शकतात हे लक्षात ठेवा. एकदा बांधकाम सुरू झाल्यानंतर घराच्याडिझाइन किंवा सामानामध्ये बदल करणे टाळाच. यासाठी बांधकाम करण्याआधी तुमच्या आगाऊ योजना तयार असणे गरजेचे आहे.
या सगळ्या साध्या सोप्या टिप्स आहेत ज्यांचे अनुसरण करून, तुम्ही तुमचा बांधकाम खर्च वाचवू शकता. तेव्हा बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी या सगळ्या टिप्सचा जरूर विचार करा.