Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'जीव माझा गुंतला' मालिकेतील अंतराच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील पहिल्या कमाईबद्दल वाचा

'जीव माझा गुंतला' मालिकेतील अंतराच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील पहिल्या कमाईबद्दल वाचा

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील अंतरा म्हणजेच योगिता चव्हाण हिच्यासोबत आम्ही तिच्या आयुष्यात इन्व्हेस्टमेंटला किती महत्त्व आहे याबाबत गप्पा मारल्या. त्यादरम्यान तिने तिची पहिली कमाई काय होती. हे पैसे तिने कशाप्रकारे खर्च केले होते याबाबत देखील तिने सांगितले.

कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतरा ही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. मालिकेत आपल्या कुटुंबासाठी ती रिक्षा चालवत असल्याचे दाखवण्यात आले होते. मालिकेत अंतराच्या भूमिकेत असलेल्या योगिता चव्हाणसोबत आम्ही तिच्या आयुष्यात इन्व्हेस्टमेंटला किती महत्त्व आहे याबाबत गप्पा मारल्या. त्यादरम्यान तिने तिची पहिली कमाई काय होती. हे पैसे तिने कशाप्रकारे खर्च केले होते याबाबत देखील तिने सांगितले. योगिताने बारावी झाल्यानंतर आयुष्यातील पहिली कमाई केली होती. तिच्याशी मारलेल्या खास गप्पा...

बारावी झाल्यानंतर एका कोचिंग क्लासमध्ये परीक्षेदरम्यान मुलांवर देखरेख करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती आणि त्यासाठी मला आठशे रुपये मिळाले होते. ती माझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिली कमाई होती. मी नुकतीच बारावी झाली असल्याने त्याकाळात मला इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? पैसे कसे गुंतवायचे असतात, पैशांची बचत करणे गरजेचे असते याविषयी काहीच माहीत नव्हते. त्यामुळे मला मिळालेल्या पैशांची बचत न करता मी सगळे पैसे खर्च केले होते. मी त्यावेळी सगळ्या पैशांची शॉपिंग केली होती. मी कोणकोणत्या गोष्टींची खरेदी केली होती ते मला आता तितकेसे आठवत नाही.

माझ्या आयुष्यात पैशांना प्रचंड महत्त्व आहे. माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाला महत्त्व असलेच पाहिजे असे मला वाटते. आपल्याला जगण्यासाठी, आपल्या भविष्यासाठी पैसा हा खूपच महत्त्वाचा असतो. मी कंजूष आहे की उधळी असे मला कोणीही विचारले तर मी कंजूषही नाही आणि उधळी देखील नाही असेच उत्तर मी देईन. कारण मी या दोन्ही गोष्टींमध्ये नेहमीच समतोल राखण्याचा प्रयत्न करते. कोणती परिस्थिती आहे त्यावर पैसे कशाप्रकारे खर्च करायचे हे मी ठरवते. माझा वाढदिवस ज्या महिन्यात असतो, त्या महिन्यात मी खूप जास्त खर्च करते. पण इतरवेळी मी खूपच कमी खर्च करण्याचा प्रयत्न करते. मला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पन्नास टक्क्याहूनही अधिक पैशांची मी बचत करण्याचा प्रयत्न करते.

आयुष्यात इन्व्हेस्टमेंट ही खूपच जास्त महत्त्वाची आहे असे मला तरी वाटते. प्रत्येकाने योग्यरित्या इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे आहे. आपल्या उतारवयासाठी लागणारे पैसे आपण एखाद्या योग्यठिकाणी गुंतवले पाहिजे. मी एक कलाकार आहे. कलाकारांनी तर आर्थिक नियोजन हे केलेच पाहिजे. मी आज एक अभिनेत्री आहे. पण काही वर्षांनी माझी काम करण्याची इच्छा नसेल अथवा काम करण्यासाठी मानसिक अथवा शारीरिक दृष्टीने मी तंदुरुस्त नसेन त्यामुळे त्या दिवसांसाठी मला आजच बचत करणे आवश्यक आहे.