Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SARATHI Scholarship: एम.फील, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सारथीची अधिछात्रवृत्ती

SARATHI SCHOLARSHIP for Maratha Kunabi Community Students

SARATHI SCHOLARSHIP: सारथी या संस्थेकडूनही राज्यातील मराठा,कुणबी (MARATHA, KUNBAI) या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गटातील विद्यार्थ्यांना एमफील आणि पीएचडीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न प्रत्येक समाजातील विद्यार्थी पाहात असतो. काहीवेळा आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाचा मार्ग खुंटतो. मात्र, अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक संस्था,शासन, तसेच खासगी व्यक्ती अथवा संस्थांकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृतीचा लाभ मिळवता येऊ शकतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी (SARATHI) या संस्थेची स्थापना केली. सारथी या संस्थेकडूनही राज्यातील मराठा,कुणबी(MARATHA,KUNBAI) या समाजातील लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी एमफील आणि पीएचडीसाठी शिष्यवृत्ती(SCHOLARSHIP)  दिली जाते. त्या शिष्यवृत्तीचे स्वरुप काय आहे? ती कशी मिळवायची? त्यासाठी पात्रता काय आहे? या बाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

काय आहे सारथी?

बहुजनांच्या विकासाच्या उन्नतीचा विचार मांडणारे छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील मराठा, कुणबी या समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच सारथी(SARATHI) या संस्थेची स्थापना केली.पुणे येथे या संस्थेचे मुख्यालय आहे. मराठा समाजाचा सर्वांगिन विकास साध्य करणे या उदिष्टाने राज्य सरकारने २०१३ मध्ये या संस्थेची स्थापना केली. या संस्थेकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि विद्वानांना पुरस्कार,फेलोशिप,शिष्यवृत्ती,स्टायपेंड इत्यादी सेवा देण्यासह शिक्षणासाठी दहावी ते पदव्युत्तर आणि उच्च स्तरापर्यंतचे मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते. शैक्षणिक विकासाच्या धोरणांवर काम करत असताना या संस्थेकडून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एमफील आणि पीएचडीसाठी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNR) दिली जाते.

सारथी शिष्यवृत्ती योजनेचे स्वरुप काय आहे? (SARATHI Scholarship)

राज्यातील मराठा, कुणबी,या समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेकडून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१९  विद्यार्थ्यांना सारथीकडून एमफील आणि पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. यामध्ये मानव्यविद्या,सोशल सायन्स,विज्ञान शाखा, अभियांत्रिकी यामध्ये एमफील किंवा पीएचडीसाठी पात्र विद्यार्थ्यांना दरमहा 31 ते 35 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.अधिछात्रवृत्ती (CSMNR )अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यास सारथीकडून मंजूरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच्या तारखेपासून अर्थसहाय्य मिळण्यास प्रारंभ होईल. यामध्ये एमफील करणाऱ्या विद्यार्थ्याला दोन वर्षासाठी आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांला 5 वर्षापर्यंत (नियम, अटींनुसार) ही शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे.

जाणून घ्या पात्रता आणि निकष (Eligibility Criteria)

शिक्षणाने आर्थिक विकाससाध्य करण्यास मदत होते. मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षणासाठी पैशांअभावी अनेक अडचणींना सामारे जावे लागते. त्यातच उच्च शिक्षणासाठी येणारा खर्चही मोठा असतो. या काही गोष्टी समोर ठेऊनच मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांनादेखील छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNR) देण्यासाठी सारथी संस्थेने पुढील काही निकष निर्धारित केले आहेत.

  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील मराठा(MARATHA), कुणबी(KUNBI), कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील असावा.
  • उमेदवाराकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गाचे प्रमाणपत्र (EWS CERTIFICATE)अथवा जात प्रमाणपत्र (CAST CERTIFICAE) असावे.
  • नॉन क्रिमीलियर उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे.
  • उमेदवाराची एमफील अथवा पीएचडीसाठी नोंदणी पूर्ण झालेली असावी.
  • उमेदवार एखाद्या खासगी, शासकीय, निमशासकीय संस्थेत काम करत असलेला उमेदवारही अर्ज करू शकतो.
  • नोकरदार उमेदवाराने नोकरीचा राजीनामा देऊन रिलिव्हिंग लेटर (Relieving Letter) सादर केले तरच शिष्यवृत्तीसाठी ठरतो पात्र.
  • अधिछात्रवृत्तीसाठी उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे
  • या अधिछात्रवृत्तीसाठी महिलासाठी 50 टक्के जागा राखीव असतात.
  • दिव्यांग उमेदवारांसाठी देखील यामध्ये 5 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

अर्ज कुठे आणि कसा करावा?

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधधछात्रवृत्तीसाठी सारथीकडून प्रतिवर्षी जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्या जाहिरातमधील निकषानुसार पात्र उमेदवारांनी संस्थेच्या https://sarthi-maharashtragov.in/ या अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईल अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर अर्जाची साक्षांकित प्रत संस्थेच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे येथील कार्यालयात दिलेल्या तारखेच्या आत पोस्टाने पाठवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया (online application Process)

  • सारथीच्या https://sarthimaharashtragov.in वेबसाइटवर जा
  • CSMNRF-2023 लिंक उघडण्यासाठी ‘सूचना बोर्ड’ वर क्लिक करा.
  • या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करा"या पर्यायावर क्लिक करा
  • तुमची आवश्यक माहिती भरा आणि 'सबमिट' वर क्लिक करा
  • माहिती भरताना शैक्षणिक कागदपत्रातील नावाचा वापर करा. तसेच फोटो,स्वाक्षरी,शैक्षणिक माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
  • अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर,प्रिंट करण्यासाठी लिंक तुमच्या ई-मेल आयडीवर पाठवली जाते
  • उमेदवारांनी त्यांच्या अर्जाची प्रत काढून घ्यावी


या प्रोसेसमध्ये काही तांत्रिक अडथळे आल्यास तुम्ही csmnrf2023@gmail.com ईमेल करून माहिती मिळवू शकता. भरलेल्या अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडून SARATHI च्या कार्यालयात रजिस्टर पोस्टाने पाठवा.

एकंदरीत पाहता कोणतीही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि ध्येयप्राप्तीसाठी उपयोगी ठरत असते. त्याचप्रमाणे सारथी संस्थेकडून देण्यात येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीमुळे होणारी आर्थिक तरतूद विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रकारे मोठे वरदान ठरू शकते. सारथीकडून मिळणाऱ्या या शिष्यवृत्तीचा उपयोग करून घेत शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती साध्य करता येऊ शकते.