मुंबई : सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी सध्या विक्रमी स्तर गाठला असून, गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळत आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सध्याची तेजी कायम राहिल्यास येणाऱ्या दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी तब्बल 1,25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
Table of contents [Show]
मागील वर्षातील झेप
गेल्या बारा महिन्यांत सोन्याच्या दरात 43% वाढ झाली आहे, तर चांदीने 62% इतका परतावा दिला आहे. फक्त सहा महिन्यांत सोनं 20,500 रुपयांनी आणि चांदी 43,000 रुपयांनी महागली आहे. इतकेच नव्हे तर, मागील एका महिन्यातच सोन्याच्या किमतींमध्ये 12,700 रुपयांची आणि चांदीत 23,000 रुपयांची वाढ झाली आहे.
जागतिक घडामोडींचा प्रभाव
या वाढीमागे आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली आहे.
- रशिया-युक्रेन संघर्ष, इझ्राईल-हमास युद्ध,
- अमेरिकेतील निवडणुकीनंतर जाहीर झालेले नवे धोरण,
- टेरिफ वॉरची भीती, डॉलरची घसरण आणि कमी व्याजदरांचे वातावरण,
या साऱ्यामुळे गुंतवणूकदारांनी सोनं आणि चांदीला सुरक्षित गुंतवणूक म्हणून पसंती दिली आहे.
विक्रमी उच्चांक
2024 अखेरीस सोनं 79,000 आणि चांदी 95,000 रुपयांवर पोहोचली होती. जून 2025 मध्ये दोन्ही धातूंनी 1 लाखांचा टप्पा पार केला. ऑगस्ट 2025 मध्ये सोनं 1,03,500 तर चांदी 1,21,000 पर्यंत वाढली. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच चांदीने 1,50,000 चा आणि सोन्याने 1,18,000 रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
दिवाळीपर्यंत काय?
सप्टेंबरमध्ये मध्यवर्ती बँकांकडून झालेल्या सोन्याच्या मोठ्या खरेदीमुळे आणि अमेरिका-चीनमधील तणावामुळे दरात आणखी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोनं 1.25 लाखांच्या जवळ पोहोचेल, असा अंदाज सराफा व्यावसायिक आणि अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
तज्ज्ञांचा सल्ला
सोन्याबरोबरच चांदीतही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत असल्याने, सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांदी हा आकर्षक पर्याय ठरू शकतो, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
थोडक्यात, सोन्या-चांदीच्या किमतींच्या सध्याच्या विक्रमी झपाट्याने वाढीमुळे येणारी दिवाळी गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.