हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक शहरांमधील अंतर कापणे सोपे झाले आहे. महामार्गामुळे 15-16 प्रवास आता अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण करणे शक्य झाले आहे. महामार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. या एक्सप्रेस वे मुळे राज्यातील अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम पाहायला मिळत आहे. हा महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाल्यावर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, त्याबाबत जाणून घेऊया.
समृद्धी महामार्ग कसा आहे?
नागपूर ते ठाणे या शहरांमधील प्रवासाचे अंतर समृद्धी महामार्गामुळे अवघ्या 8 तासात पार करता येणार आहे. 701 किमीच्या या महामार्गाला हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. हा महामार्ग जवळपास 14 जिल्ह्यातून जातो. यामध्ये नागपूर, वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर आणि नाशिक सारख्या राज्यातील प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील जवळपास 26 तालुके आणि आसपासच्या 400 गावांना हा महामार्ग प्रमुख शहरांशी जोडेल. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढविण्यास मदत होणार आहे. याशिवाय, कृषि, उद्योगधंदे व पर्यटनाचाही विस्तार होईल. टप्याटप्प्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. आता केवळ ठाणे जिल्ह्यातील ठराविक भागातील काम बाकी असून, यानंतर हा संपूर्ण महामार्ग प्रवासासाठी खुला होईल. याशिवाय, महामार्गाचा चंद्रपूर, गोंदियापर्यंतही विस्तार केला जाईल.
महामार्गाचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल?
रिअल इस्टेट | 701 किमीच्या या महामार्गामुळे रिअल इस्टेट क्षेत्रावरही परिणाम पाहायला मिळतोय. हा महामार्ग राज्यातील जवळपास 14 जिल्ह्यांमधून जातो. याशिवाय, आसपासची 400 गावे प्रमुख शहरांना जोडली गेली आहे. यामुळे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचा विस्तार दिसून येत आहे. ज्या भागांमधून हा महामार्ग जातोय, तेथील रिअल इस्टेटच्या किंमतीतही वाढ झाल्याची दिसून आली आहे. |
पर्यटन स्थळे | समृद्धी महामार्गामुळे राज्यातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. महामार्ग राज्यातील प्रमुख पर्यटन क्षेत्रे लोणारचे सरोवर, वेरूळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबीका मकबरा यांना जोडतो. प्रवासाचे अंतर कमी झाल्याने या पर्यटन स्थळांना भेट देणे नागरिकांना सोपे होणार आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी एंटरचेंज आहेत, ज्यामुळे नागरिक ऐतिहासिक स्थळे, संग्रहालये, अभायरण्यांना सहज भेट देऊ शकतात. |
कृषि समृद्धी नगरे | समृद्धी महामार्गालगत 19 कृषि समृद्ध केंद्र उभारली जाणार आहेत. यामुळे या भागांमध्ये औद्योगिक विकास होण्यास मदत होईल. हा सर्वात वेगवान महामार्ग असून, यावर चालक 150 किमी प्रतितास वेगाने वाहन चालवू शकतो. त्यामुळे कृषीमालाची वाहतूक करणेही सुलभ होईल व माल खराब होण्याचे प्रमाण कमी होईल. कृषि उद्योजकांना यामुळे व्यवसायात फायदा होईल. त्यांच्यासाठी नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. |
दुष्कळी भागांचा विकास | महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाडा व विदर्भातील दुष्काळी भागांना होणार आहे. जवळपास 30 ते 40 हजार वाहने दिवसाला या मार्गावरून प्रवास करतील. महामार्गावर अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स, सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. दृष्काळग्रस्त भागातील उद्योगांमध्ये वाढ झाल्यास तेथील बेरोजगारीसारखी समस्या देखील दूर होण्यास मदत होईल. |
रोजगाराच्या संधी | या महामार्गासोबतच आजुबाजूला उद्योगधंदे, शाळा-कॉलेज, हॉटेल, हॉस्पिटल इत्यादी उभारले जाणार आहे. याशिवाय, वीज, इंटरनेटसह अनेक सुविधा देखील उपलब्ध असतील. त्यामुळे खेड्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल. वस्तूंच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे अनेक भागातील रोजगाराचा प्रश्न सुटेल. राष्ट्रीय दळणवळणात आणि मालवाहतूक सुविधेत या महामार्गाचे योगदान जवळपास 6 टक्के असेल. यातून हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. |