कोरोना आणीबाणीनंतर विमा क्षेत्रामध्ये अनेक बदल झाले. भारतात कोरोनाचा प्रसार होण्याआधी फक्त शहरी भागामध्ये आरोग्य विमा घेण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, आता ग्रामीण भागात आरोग्य विमा पॉलिसी घेणार्यांचे प्रमाण वाढत असल्याचे एक अहवालातून समोर आले आहे. आरोग्य विम्याबाबत जनजागृती कोरोनापूर्व काळापेक्षा जास्त वाढल्याचे समोर आले आहे.
वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रुग्णालयाचा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या हाताबाहेर गेला आहे. त्यामुळे आता निमशहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य विमा पॉलिसी घेणार्यांचे प्रमाण वाढत असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
कोटक महिंद्रा विमा कंपनीने २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये दुप्पटपेक्षा जास्त विमा पॉलिसी विकल्या आहेत. 2022 आर्थिक वर्षात कंपनीने 13% पॉलिसी ग्रामीण भागात विकल्या होत्या. त्यामध्ये वाढ होऊन चालू आर्थिक वर्षात 32 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. विमा कवच असणाऱ्यांची संख्या 11 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर गेली आहे. Niva Bupa इन्शुरन्स कंपनीने ग्रामीण भागातील पॉलिसीच्या विक्रीमध्ये 160 टक्क्यांची वाढ घेतली. आर्थिक बोजा न घेता आरोग्याचा खर्च भागवण्यासाठी इन्शुरन्स गरजेचा असल्याची जाणीव नागरिकांमध्ये होत असल्याचे विमा कंपन्यांचे म्हणणे आहे.
स्टार कंपनीकडे असलेल्या एकूण पॉलिसींपैकी 23 टक्के ग्रामीण भागातील आहेत. कोरोनानंतर नागरिकांमध्ये आरोग्य विमा घेण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे, असे स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे सीइओ जगन्नाथन यांनी म्हटले. ग्रामीण भागातील बऱ्याच नागरिकांना सरकारी विमा योजनांचा लाभ मिळतो, त्यामुळे विमा पॉलिसी खरेदी करण्याचे प्रमाण शहरी भागांपेक्षा तुलनेने बरेच कमी राहील, असे रिलायन्स विमा कंपनीचे म्हणणे आहे.