Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

March Appraisal: मार्च महिन्यात पगार वाढणार; गुंतवणुकीचे नियोजन कसे करणार? जाणून घ्या टीप्स

Planning for Increasing Salary

March Appraisal: मार्च महिन्यात साधारणत: सर्व कंपन्यांचे Appraisal होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते. ही वाढ झालेली पगारवाढ लगेच खर्च करण्याऐवजी किंवा त्यावर टॅक्स लागतोय का? हे तपासून त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

Planning for Increasing Salary: नोकरदार वर्गासाठी पगारवाढीसारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. कारण नोकरीत होणारी पगारवाढ ही फक्त भावनिक किंवा आर्थिक नसते. ते तुमच्या मेहनतीचे फळ आहे आणि त्यातून पुढील वर्षभरासाठी कामातील उत्साह वाढतो. पण या पगारवाढीच्या आनंदात तितक्याच तत्परतेने गुंतवणुकीवरही लक्ष ठेवले पाहिजे. त्याचा टॅक्सवर काही परिणाम तर होत नाही ना! हे  तपासून त्याचे नियोजन केले पाहिजे.

वर्षानुवर्षे नोकरी करत असताना वाढलेल्या पगाराचा आनंद आणि उपभोग घेणं हे क्रमप्राप्त आहे. पण फायनान्स आणि गुंतवणुकीतील बेसिक नियमानुसार तुमच्या पगारात वाढ झालेल्या एकूण उत्पन्नातील किमान 75 टक्के रक्कम गुंतवली (Planning for Increasing Salary) पाहिजे. अशाप्रकारे तुम्ही भविष्यात वेळोवेळी बचत केली तर तुम्हाला तुमच्या पगारवाढीचा आनंद नक्कीच घेता येईल. पण बरेच जण पगारवाढ झाली की, त्याचे जोरात सेलिब्रेशन करतात. त्यासाठी भरपूर पैसे खर्च करतात. परदेशातील ट्रीप प्लॅन करतात. पण यासाठी फक्त पगारवाढीची वाट न पाहता नियमित बचतीमधूनही हे करता येऊ शकते.

नेमकी किती पगारवाढ झाली लक्षात घ्या

पगारवाढ झाली की आनंदाला पारावर उरत नाही. पण त्या आनंदात तुमचा प्रोव्हिडंट फंडमधील हिस्सा किती वाढणार? तसेच पगारवाढ झाल्यामुळे तुम्हाला टॅक्स लागू होईल का? तो किती लागू शकेल? अशा 2-3 बेसिक प्रश्नांची माहिती जाणून घ्यायला हवी. तसेच पगारवाढीमुळे तुमच्या हातात नेमके जास्तीचे किती पैसे येणार आहेत. हे समजून घेणे गरजेचे आहे आणि त्याची त्यानुसार गुंतवणूक करणे गरजेचे आहे. गुंतवणुकीच्या नियमानुसार वाढलेल्या पगारातील किमान 75 टक्के रक्कम गुंतवली पाहिजे. पण तुम्ही किमान 50 टक्के रक्कम गुंतवणे आवश्यक आहे. तसेच तुमची गुंतवणूक पूर्वीपासून सुरू असेल तर, त्यातील हिस्सा वाढवायला काहीच हरकत नाही. उदाहरणार्थ, तुमचा पगार 10 हजारांनी वाढला आहे; तर तुम्ही त्यातील 5 ते 7 हजार रुपये गुंतवणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे गाठण्यास मदत होईल.

गुंतवणुकीतील तफावत ओळखा

प्रत्येकाच्या आयुष्यात लहान-मोठी आर्थिक उद्दिष्ट्ये असतात. ती पूर्ण करण्यासाठी बऱ्याचवेळा कसरत करावी लागते. यासाठी ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जी गुंतवणूक केली आहे. ती पुरेशी आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी गुंतवणूक केलेला निधी अपुरा पडत असेल किंवा अधिक वाटत असेल तर त्यानुसार त्यात बदल केले पाहिजे.

उद्दिष्टानुसार गुंतवणुकीचे पर्याय निवडा

एकदा का तुमच्या गुंतवणुकीतील तफावत तुमच्या लक्षात आली की, त्यानुसार गुंतवणुकीचे विविध पर्याय निवडणे गरजेचे आहे. जसे की, आपत्कालीन निधी वाढवणे, नवीन एसआयपी सुरू करणे तसेच निवृत्ती नियोजनातील रकमेत वाढ करणे अशा उद्दिष्टांनुसार त्यातील गुंतवणूक बदलली पाहिजे किंवा त्यात वाढ केली पाहिजे.

गुंतवणुकीचे योग्य पर्याय निवडा

पगारवाढ झाल्यानंतर बऱ्याचदा पैसे कोठे आणि कसे गुंतवायचे याची माहिती नसल्यामुळे ते चुकीच्या ठिकाणी गुंतवले जातात. त्यामुळे त्याचा पुरेसा उपयोग होत नाही. पूर्वीपासून तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यामध्येच आणखी गुंतवणूक करण्याऐवजी वैविध्यपूर्ण गुंतवणूक केल्यास त्याचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी गुंतवणुकीचे विविध पर्यायांची माहिती घेऊन त्याचे भविष्यातील फायदे-तोटे लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी.

नोकरदार वर्गासाठी पगारवाढ ही अशी गोष्ट आहे; ज्याची प्रत्येकजण वाट पाहत असतो. कारण पैसे खर्च होण्याचे मार्ग खूप असतात आणि पैसे येण्याचा मार्ग हा एकमेव असतो. तो म्हणजे पगार. त्यामुळे क्षणिक आनंदापेक्षा भविष्यातील आनंदाचा विचार करून पगारातील झालेली वाढ ही निश्चितपणे योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे. त्याचबरोबर आपण सध्या जे जीवन जगत आहोत. त्याचाही आनंद घेता आला पाहिजे. एकूण पगारातील वाढीतून भविष्यासाठी पैसे वाचवणे आणि स्वत:सह आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे, हे गरजेचे आहे.