तुम्हाला जर एटीएम मधून पैसे काढायचे असतील आणि तुम्ही तुमचे एटीएम कार्ड जर घरी विसरला असाल तर काय कराल? अशावेळी युपीआय पेमेंटचा तुम्ही विचार करू शकता. परंतु ज्याला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्याच्याकडे UPI नसेल तर? मग तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तुमच्यापैकी अनेक लोकांना असा अनुभव कधी ना कधी आलाच असेल. परंतु यावर एक उपाय घेऊन आली आहे बँक ऑफ बडोदा. होय, बँक ऑफ बडोदाने अशी एक योजना आणली आहे ज्यात तुम्ही एटीएम कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकाल.
सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्वाची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा (BoB) ने इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत आता ग्राहक UPI वापरून बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. UPI द्वारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देणारी बँक ऑफ बडोदा ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना बँकेने म्हटले आहे की, त्यांच्या ICCW सुविधेचा लाभ घेऊन, BHIM UPI सह बँक ऑफ बडोदाचे ग्राहक तसेच इतर बँकांचे वेगवेगळे UPI वापरणारे ग्राहक देखील बँक ऑफ बडोदाच्या ATM मधून पैसे काढू शकतील. बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना डेबिट कार्ड वापरण्याची आता गरज उरणार नाही, असे देखील बँकेकडून सांगण्यात आले आहे.
Bank of Baroda launched UPI based ATM withdrawal:
— NebulaWorld (@nebula_world) June 6, 2023
Interoperable Cardless Cash Withdrawal (ICCW) facility using UPI at ATM is launched by BoB, making it 1st PSB in India.
Customers can avail two transactions a day per account with a withdrawal limit of Rs 5,000 per transaction pic.twitter.com/oLv8z8MXPN
ICCW सर्विस कशी काम करेल?
इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल ही सिस्टिम युरोपियन देशांमध्ये वापरली जाते आहे. याचा वापर करण्यासाठी एटीएमच्या ‘UPI मोड’ या पर्यायात ग्राहकाला जितकी रक्कम काढायची आहे ती रक्कम लिहावी लागेल. त्यानंतर एटीएम मशिनमध्ये UPI वरून एक QR कोड जनरेट होईल. हा कोड ग्राहकाला त्यांच्या UPI स्कॅन करावा लागेल. QR कोड स्कॅन झाल्यानंतर ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर UPI साठी सेट केलेला कोड देखील टाकावा लागेल. सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित भरल्या असतील तरच तुम्हाला ATM मधून पैसे काढता येतील.
ATM द्वारे होणारे घोटाळे कमी होणार
गेल्या काही दिवसांपासून ATM बाबतीत होणाऱ्या आर्थिक फसवणुकीची प्रकरणे वाढली होती. त्याबाबतच्या तक्रारी आरबीआयला प्राप्त झाल्या होत्या. खरे तर वर्षभरापूर्वी, मे 2022 मध्ये अशी सुविधा आणण्याची घोषणा आरबीआयने केली होती. यातून कार्ड क्लोनिंग,स्किमिंग, डिव्हाइस टॅम्परिंग सारख्या फसवणुकीला आळा बसेल असे आरबीआयने म्हटले होते. आता बँक ऑफ बडोदाच्या निमित्ताने ही सुविधा भारतात लागू करण्यात आली आहे.
एकावेळी फक्त 5000 रुपये काढता येणार
बँक ऑफ बडोदाचे मुख्य डिजिटल अधिकारी अखिल हांडा यांनी माहिती देताना म्हटले आहे की, एटीएम कार्डशिवाय UPI स्कॅनद्वारे पैसे काढण्यासाठी ग्राहकांसाठी काही नियम देखील असणार आहेत. ग्राहक एका वेळी जास्तीत जास्त 5,000 रुपये काढू शकतील आणि दिवसातून केवळ 2 वेळाच व्यवहार करू शकतील. म्हणजेच ICCW सर्विसचा वापर करून ग्राहक एका दिवसात जास्तीत जास्त 10,000 रुपये काढू शकतो.