• 02 Oct, 2022 09:18

रुपयाच्या घसरणीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम!

रुपयाच्या घसरणीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम!

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात 11 पैसे घसरण होऊन तो 77.85 या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला.

गेल्या कित्येक दिवसापासून शेअर बाजारात (Stock Market) घसरणीचे सत्र सुरू आहे. शेअर बाजारातील अस्थिरता सेन्सेक्स आणि निफ्टीच्या (Sensex and Nifty) अंकातून दिसून येत आहे. शुक्रवार सुरवातीच्या सत्रातील घसरण शेवटच्या सत्रापर्यंत कायम होती. अखेर शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) 1000 अंकानी घसरुन 54,300 वर बंद झाला तर निफ्टीतही (Nifty) 276 अंकाची घसरण होत 16.201 वर बंद झाला. तर अमेरिकी डॉलरच्या (USD) तुलनेत रुपयाच्या मूल्यातही 11 पैसे घसरण होऊन तो 77.85 या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला. 

डॉलरच्या (USD) तुलनेत रुपयाचा दर घसरल्याने भारताचा आयात खर्च (Import Costs) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलासह (Crude Oil) इतर महत्त्वाच्या वस्तूंची आयात करणे आणखी महाग होणार आहे. त्यामुळे भारताची परकीय गंगाजळी आटण्याची भीती आहे. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे.

जगभरातील भांडवली बाजाराचा परिणाम

अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्‍‌र्हकडून (Federal Reserve BANK) व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात शुक्रवारी घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत भांडवली बाजारावर होऊन सेन्सेक्समध्ये (Sensex) 1000 अंकानी पडझड झाली. शुक्रवारी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात केलेल्या शेअर्स विक्रीचा जबर फटका परकीय चलन बाजारालाही (Foreign Exchange Market) बसला. यामुळे शुक्रवारी रुपया प्रति डॉलर 11 पैसे घसरणीसह 77.85 या नीचांकी पातळीवर गेला. आंतरबँक परकीय चलन बाजारात शुक्रवारच्या सत्रात रुपयाने 77.81 या नीचांकापासूनच व्यवहारास सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात रुपयाने 77.79 या उच्चांकी पातळीला स्पर्श केला, तर नंतर 77.87 हा ऐतिहासिक तळ गाठला होता.

अमेरिकेतील किरकोळ किमतीवर महागाई दर (Inflation Rate) 8.6 टक्के वाढल्याने फेडरल रिजर्व्ह बँक पुढील आठवड्यात व्याजदरात आणखी वाढ करेल अशा भीतीने अनेक गुंतवणूकदार आपल्या शेअर्सची विक्री करण्याच्या विचारात आहेत. तर दुसरीकडे युरोपीय मध्यवर्ती बँकेने आपल्या धोरण बैठकीत पुढील महिन्यापासून दरवाढ करण्याचे संकेत दिल्याने पुढे काय होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.