विमा कंपन्यांची मागणी आणि वाढत चाललेले विम्याचे दावे लक्षात घेऊन सरकारने बुधवारी, दि. 1 जूनपासून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या दोन राष्ट्रीय आरोग्य विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठीच्या वार्षिक प्रीमियममध्ये प्रतिदिन 1.25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेचा वार्षिक प्रीमियम 330 रुपये होता, तो वाढून 436 रुपये होणार आहे. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम 12 रूपये होता. त्यात 8 रूपयांनी वाढ करून तो 20 रुपये करण्यात आला आहे. हे नवीन दर 1 जून, 2022 पासून लागू होणार. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये एकूण 7 कोटी आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये 22 कोटी नोंदणीकृत लाभार्थी आहेत.
बऱ्याच वर्षांनंतर सरकारने PMJJBY आणि PMSBY या विमा योजनांच्या प्रीमियममध्ये दरवाढ केली आहे. गेल्या सात वर्षांपासून सरकारने यात कोणतीही वाढ केलेली नव्हती. दिवसेंदिवस दाव्यांची संख्या वाढत असल्याने विमा कंपन्यांना तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे या कंपन्यांकडून प्रीमियममध्ये वाढ करण्याची सतत मागणी केली जात होती. दरम्यान, प्रीमियमचे दर वाढवल्याने खासगी कंपन्यांचा सहभाग आणखी वाढेल, असे सांगण्यात येत आहे.
दाव्यांच्या संख्येत वाढ
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत 31 मार्च, 2022 पर्यंत प्रीमियमद्वारे 1134 कोटी रुपये जमा झाले; तर 2513 कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत प्रीमीयम म्हणून 9737 कोटी रुपये जमा झाले आणि 14,144 कोटी रुपयांचे दावे अदा करण्यात आले.
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना काय आहे? What is PMJJBY Scheme?
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना (PMJJBY) ही एक टर्म लाईफ इन्शुरन्स (Term Life Insurance) पॉलिसी आहे; यामध्ये 2 लाख रुपयांचा डेथ क्लेम कव्हर दिला जातो. या पॉलिसीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. 18 वर्षांवरील आणि 50 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी काढू शकतो.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे? What is PMSBY Scheme?
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास संरक्षण प्रदान करते. या पॉलिसीद्वारे 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. अंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे संरक्षण मिळते.