Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement:रिटायरमेंटमध्ये या गोष्टी करणे टाळा!

Avoid doing these things in retirement!

Image Source : www.integracare.com

Retirement: रिटायरमेंटच्या काळातील काही चुका आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकतात. त्यामुळे अशा चुका आवर्जून टाळणे गरजेचे आहे. चला तर या चुका नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहू.

रिटायरमेंट म्हणजेच निवृत्तीचा काळ तसा आरामात जगण्याचा काळ असतो. पण प्रत्येकाच्या वाट्याला निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासीन येत नाही. अनेकांना निवृत्तीच्या वयानंतरही कष्ट करावे लागतात. तर काहींना निवृत्तीनंतरचे आयुष्य म्हणजे आनंदीआनंद वाटतो. प्रत्येकाची विचार करण्याची आणि जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक जण निवृत्तीनंतरच्या आयुष्याकडे आपापल्या नजरेने पाहत असतो.

आज आपण निवृत्तीनंतरचे आयुष्य जगताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. हे जाणून घेण्याबरोबरच कोणत्या चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत हे समजून घेणार आहोत. कारण निवृत्तीचा काळ सुरू झाला की, अनेकवेळा भावनेच्या भरात निर्णय घेतले जातात. त्यामुळे ते चुकीचे ठरू शकतात किंवा अशा निर्णयांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. तर आज आपण निवृत्तीनंतर, निवृत्तीच्या काळात किंवा निवृत्त होण्यापूर्वी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे पाहणार आहोत.

कायदेशीर वारसपत्र तयार न करणे/अपडेट न करणे

कायदेशीर वारसपत्र किंवा आपल्या पश्चात संपत्तीवरून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी कायदेशीर बाबी वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे. वारसपत्र किंवा विल तयार करण्याचा निर्णय ऐन निवृ्त्तीनंतर घेण्याऐवजी त्याची सुरुवात आधीपासूनच करणे गरजेचे आहे. रिटायरमेंटनंतर असे निर्णय भावनेच्या भरात घेतले जातात. ते एकांगी होऊ नयेत यासाठी त्याबाबत पूर्वविचार करणे गरजेचे आहे.  

बजेट कोलमडणे

रिटायरमेंटनंतर बजेट व्यवस्थित कसे राहील. यावर जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे. ते कोलमडणार नाही किंवा ओव्हर बजेट जाणार नाही. याची वेळोवेळी खबरदारी घेतली पाहिजे. तुम्ही ठरवलेले बजेट तुमच्याकडूनच पाळले जात नसेल तर त्यात कुठेतरी चुका होत असतील. त्या लगेच सुधारणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टींवर खर्च करता येईल.  

भरमसाठ कर्जे काढणे

निवृत्तीनंतर शक्यतो कर्जाचा विचार न केलेलाच योग्य ठरू शकतो. कर्जामुळे तुमच्या मासिक व्यवहारातील एक मोठी रक्कम कर्जाचे हप्ते फेडण्यात जाते. यामुळे इतर गोष्टींवर निर्बंध येतात. त्यामुळे उतारवायत कर्ज काढू नये आणि पेन्शनची रक्कम कर्जाच्या ईएमआयवर कधीच खर्च करू नका.

मुलांवर अनावश्यक खर्च करणे

मुले मोठी झाली की, त्यांना पैशांची आणि खर्चाची जाणीव करून देणे गरजेचे आहे. मुलांवर केला जाणारा खर्च गरजेचा आहे का? किंवा त्यातून भविष्यात काही लाभ होणार आहेत का? याचा विचार करूनच खर्च करावा. अनेकवेळा मुलांवरील आंधळ्या प्रेमापोटी त्यांच्यावर विनाकारण पैसा खर्च केला जातो. उलट मुलांना पैशांचे मूल्य आणि त्याचा वापर याबाबत सतत सांगणे गरजेचे आहे.

पेन्शनमधील पैशांचा वारेमाप खर्च

अनेक पेन्शनधारक आपल्या पेन्शनचा वापर योग्य विचार न करता खर्च करतात. जसे की, अनेक पालक पेन्शनचा वापर घरातील सुखसोयीच्या वस्तू घेण्यासाठी करतात. उलट पेन्शनमधून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग आपत्कालीन निधीसारखा केला पाहिजे. म्हणजे जिथे गरजेचा खर्च आहे. तिथेच ती खर्च केली पाहिजे. इतर खर्चांसाठी पेन्शनमधील पैसे वापरू नयेत.

एकटे राहणे

रिटायरमेंटनंतर पेन्शन स्वरूपात भरपूर पैसा मिळाला तरी एकटे राहण्याचा निर्णय घेऊ नये. निवृत्तीनंतर पैसे हे लागतातच. पण त्याचबरोबर संवाद साधण्यासाठी, सुख-दु:खाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी सोबत कोणीतरी असणे गरजेचे आहे. एकत्रित राहण्यामुळे त्याचा शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होतो. एकटे राहिल्यामुळे मनात नैराश्याची भावना निर्माण होऊ शकते.

वाटेल तसा आहार घेणे

निवृ्त्तीनंतरचा आहार हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण निवृत्तीपूर्वी किंवा तरुणवयात तुम्ही आहाराची जीवनशैली जगला. अगदी त्याप्रमाणे तुम्ही निवृत्तीनंतर स्वीकारू शकत नाही. यामुळे तुमच्या शारीरिक स्वास्थावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण तुमचा खर्च वाढू शकतो. निवृत्तीनंतर आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समतोल आहार घेणे कधीही योग्य ठरू शकते.

सरकारकडून मिळणाऱ्या सवलती नाकारणे

सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतं. या योजनांद्वारे ज्येष्ठ नागरिकांची एकप्रकारे जबाबदारी स्वीकारत असते. यामध्ये विविध गुंतवणूक योजनांबरोबरच, इन्शुरन्स योजना, बचत योजना किंवा ज्येष्ठांना मिळणाऱ्या थेट लाभाच्या योजनादेखील असतात. या योजनांचा वेळोवेळी लाभ घेणे आवश्यक आहे.

वाढत्या महागाईत भरमसाठ खर्च करणे

रिटायरमेंटनंतर ज्या पद्धतीने तुमचे नियमित मासिक उत्पन्न कमी होते. त्याप्रमाणे महागाई मात्र कमी होत नाही. उलट वर्षे वाढली की, महागाईसुद्धा वाढते. परिणामी अनेक गोष्टी महाग होतात. त्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. निवृत्तीनंतर उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे खर्च आणि पैशांचा वापर महागाई लक्षात ठेवून करणे योग्य ठरू शकते.

वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक हालचालींवर मर्यादा येतात. त्याला अनुसरून प्रत्येक जण आपल्या शरीराची काळजी घेतो. अगदी त्याचप्रमाणे रिटायरमेंटनंतरच्या कालावधीत वरीलप्रमाणे काही चुकीच्या गोष्टी टाळल्या तर तुमच्यावर तितकासा आर्थिक ताण येणार नाही आणि तुम्ही तुमचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासीनपणे जगू शकता.