महागाईच्या ताज्या आकडेवारीने रिझर्व्ह बँकेची झोप उडाली आहे. ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर 7% वर गेला आहे. ‘आरबीआय’च्या उद्दिष्टापेक्षा तो जास्त असल्याने बँकेला पुन्हा एकदा कठोर पावले उचलावी लागतील. महागाईने केवळ भारतालाच हैराण केलेले नाही तर जगभरातील अनेक देश सध्या या संकटाशी दोन हात करत आहेत. आंतराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत 40 हून अधिक सेंट्रल बँकांनी महागाई नियंत्रणासाठी व्याजदर वाढवले आहेत. येत्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा रेपो दर वाढवण्याची शक्यता गडद बनली आहे. (RBI Likely to Hike Repo Rate Before Festive Season)
जुलै महिन्यात महागाई दर 6.71% होता.तो ऑगस्ट महिन्यात 7% इतका वाढला. रिझर्व्ह बँकेने महागाईला 2% ते 6% या दरम्यान नियंत्रणात ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र सलग तिसऱ्या तिमाहीत प्रत्यक्ष महागाई दर हा 6% वरच राहिल्याने आरबीआयवरील दबाव वाढला आहे. ऑगस्टमध्ये फूड इन्फ्लेशन 7.22% इतके वाढले आहे. अन्नधान्य महागाईस गहू, तांदूळ, डाळी, साखर, दूध, भाजीपाला, मटण,मच्छी या खाद्य वस्तूंच्या किंमतीत वाढ कारणीभूत ठरली. महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारने मागील महिन्याच्या अखेरीस गव्हाच्या आट्याची निर्यात बंद केली होती. नुकताच तुकडा तांदळाची निर्यात बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मागील तीन महिन्यात सर्वच प्रकारच्या तांदळांच्या किंमतीत 20% ते 30% वाढ झाली होती. त्यामुळे सरकारला तांदुळ निर्यातीवर निर्बंध लावावे लागले.
रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण बैठक (Monetary Policy Meeting) 30 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. या बैठकीत बँकेकडून प्रमुख व्याजदर (Repo Rate) किमान 0.50% वाढवला जाईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘आरबीआय’ने व्याजदर वाढवला तर ऐन सणासुदीत बँकांची कर्जे पुन्हा वाढतील. दसरा, दिवाळीमधील खरेदीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषत: रिअल इस्टेट,ऑटो या उद्योगांना याचा फटका बसेल. ऐन सणासुदीत उत्सवी खरेदीला उधाण येते. मात्र कर्जे महागल्यास ग्राहकांना गाडी किंवा घर खरेदी करताना दोनदा विचार करावा लागेल. बँकांनी यापूर्वीच मागील दोन महिन्यात कर्जदर वाढवले आहेत. यामुळे वैयक्तिक कर्ज, कार लोन, होम लोन अशी सर्वच प्रकारची कर्जे महागली आहेत.
यापूर्वी मे ते ऑगस्ट या काळात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 1.40% वाढ केली होती. चालू वर्षात महागाईची सरासरी 6.7% राहील, असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत महागाईचा दर 7% होता. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या दिर्घकाळ युद्धाने आशिया आणि पाश्चिमात्य देशांमधला इंधन आणि शेतमालाचा पुरवठा विस्कळीत केला आहे. या युद्धानंतर युरोपात महागाईचा अभूतपूर्व भडका उडाला आहे. युरोपात महागाईने 40 वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला. ज्यामुळे युरोपीयन सेंट्रल बँकेने गेल्या आठवड्यात व्याजदर वाढवला होता. महागाई आटोक्यात आली नाही तर युरोपातील बहुतांश देश मंदीच्या कचाट्यात सापडतील, असे बोलले जात आहे. युद्धानंतर भारतात देखील खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली होती. अजूनही खाद्य तेलाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्याशिवाय पेट्रोल आणि डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीने भारतीय होरपळून निघाले होते.