तांदूळ आणि गव्हाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत जवळपास 150 देशांना तांदळाची निर्यात करतो. निर्यात कमी व्हावी आणि देशांतर्गत बाजारात तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा, या हेतूने केंद्र सरकारने तुकडा तांदळाची निर्यात तातडीनं बंद केली आहे. त्याशिवाय तुकडा तांदळावर 20% निर्यात शुल्क लागू केले आहे. (Govt. ban Broken Rice and Imposed 20% Export Duty)
जूनपासून सर्वच प्रकारच्या तांदळांच्या किंमतीत सरासरी 30% वाढ झाली होती. पाश्चिमात्य देशांमधील वाढती मागणी आणि चांगला भाव मिळत असल्याने व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली. बांग्लादेशी व्यापाऱ्यांनी भारतातून प्रचंड तांदूळ खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तांदळाच्या निर्यातीला रोखण्यासाठी सरकारने अखेर कठोर पावले उचलली आहेत. तुकडा तांदळाची निर्यात 100% बंद करण्यात आली आहे. तुकडा तांदळावर 20% निर्यात शुल्क 9 सप्टेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहे. बासमती आणि उकडा तांदळावर तूर्त कोणतेही शुल्क लागू नाही, असे सरकारने म्हटलं आहे.
बहुतांश राज्यात यंदाच्या हंगामात पावसाने सरासरीदेखील गाठली नाही. पहिल्या टप्प्यात मॉन्सून काही राज्यांमध्ये उशीरा दाखल झाला होता. परिणामी शेतकऱ्यांनी भात लागवड कमी केली. लागवड क्षेत्र कमी झाल्याने यंदा तांदळाच्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. ज्यामुळे तांदळाच्या साठ्यावर सरकार अवलंबून असेल.
Table of contents [Show]
- वर्ष 2011 ते 2021 दरम्यान भारतातून झालेली तांदळाची निर्यात (अब्ज रुपयांमध्ये)
- उशिरा सुचलेले शहाणपण (Late Decision Will spur Inflation)
- तडकाफडकी निर्णय, निर्यातदार अडचणीत (Exporter want Relief)
- उत्पादन कमी होणार कारण...(Rice Production will fall)
- भारताची शुल्कवाढ, थायलंड, व्हिएतनामला संधी
- चीनची होणार कोंडी (China In Trouble)
वर्ष 2011 ते 2021 दरम्यान भारतातून झालेली तांदळाची निर्यात (अब्ज रुपयांमध्ये)
Source : www.statista.com
रशिया आणि युक्रेन युद्धाने जागतिक कमॉडिटी बाजारात वस्तू आणि अन्नधान्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. काही देशांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसला तर काही ठिकाणी भीषण दुष्काळ पडला आहे. या विचित्र परिस्थितीचा शेतीला फटका बसला असून अन्नधान्यांच्या उत्पादनात घट होऊन बाजारातील पुरवठ्यावर परिणाम होईल, असा अंदाज विविध संस्था व्यक्त करत आहेत.
उशिरा सुचलेले शहाणपण (Late Decision Will spur Inflation)
मागील तीन महिन्यात सर्वच प्रकारच्या तांदळांच्या किंमतीत 20% ते 30% वाढ झाली होती. यामुळे महागाईचा भडका उडाला. अखेर सरकारला तुकडा तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू करावे लागले. यापूर्वी गहू, गव्हाचे पीठ आणि साखर या खाद्य वस्तूंबाबत देखील असाच निर्णय घ्यावा लागला होता. महागाईने सामान्यांची होरपळ झाल्यानंतर सरकारकडून निर्यात बंदीसारख्या उपाययोजना केल्या जातात. मात्र हे निर्णय वेळेआधीच घेतले तर वस्तूंच्या किंमती नियंत्रणात राहू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
तडकाफडकी निर्णय, निर्यातदार अडचणीत (Exporter want Relief)
केंद्र सरकारने तुकडा तांदळावर निर्यात बंदी घातल्याने निर्यातदार धास्तावले आहेत.नजीकच्या काही महिन्यांत तांदळाची निर्यात 25% कमी होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अनेकांनी परदेशातील व्यापाऱ्यांबरोबर एक्सपोर्ट अॅग्रीमेंट केली आहेत. काहींची तांदळाने भरलेली जहाजे बंदरात उभी आहेत. याबाबत सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी तांदूळ निर्यातदारांनी केली आहे. निर्यात शुल्क 20% केल्याने परदेशातील तांदळाचे खरेदीदार जादा पैसे देणार नाहीत, कारण अगोदरच या व्यवहाराचे कॉंट्रॅक्ट बनले आहे. त्यामुळे सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निर्यातदारांनी केली आहे.
उत्पादन कमी होणार कारण...(Rice Production will fall)
मॉन्सूनचा लहरीपणामुळे आणि पूर, अतिवृष्टीमुळे पूर्वेकडील बहुतांश राज्यात भात लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे यंदा खरिप हंगामात भारतात एकूण 112 दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. पूर्वेकडील सहा राज्यांमध्ये भात लागवड क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 3.7 दशलक्ष हेक्टर्सने घटले आहे. एकरी 2.6 टन भाताचे उत्पादन घेतले जाते मात्र लागवड क्षेत्र कमी झाल्याने यंदा उत्पादनात किमान 10 दशलक्ष टन तांदळाची घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात 130 दशलक्ष टन तांदळाचे भारतात उत्पादन झाले होते. 21 दशलक्ष टन तांदूळ निर्यात करण्यात आला होता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओदिशा या राज्यांतील तांदळाच्या एकूण उत्पादनात 8 ते 9 दशलक्ष टनांची घट होण्याची शक्यता आहे.
भारताची शुल्कवाढ, थायलंड, व्हिएतनामला संधी
दरम्यान, तुकडा तांदळावर निर्यात शुल्क वाढल्यानंतर भारतातून तांदूळ खरेदी करणारे जागतिक खरेदीदार थायलंड आणि व्हिएतनामकडे वळतील. तिथून तांदूळ खरेदीला प्राधान्य जगभरातील कंपन्या देतील, असे बोलले जाते. भारत हा तांदळाचा चौथा मोठा निर्यातदार देश आहे. थायलंड, व्हिएतनाम आणि अमेरिका जागतिक बाजारात मोठे तांदूळ निर्यातदार आहेत. 2021 मध्ये भारताने विक्रमी 21.5 दशलक्ष टन तांदळाची निर्यात केली होती. जगभरातील एकूण निर्यातीमध्ये भारताचा 40% वाटा आहे.
चीनची होणार कोंडी (China In Trouble)
भारतातून तुकडा तांदूळ खरेदी करणारा चीन हा आशियातील मोठा खरेदीदार आहे. 2021 मध्ये चीनने भारतातून 1.1 दशलक्ष टन तुकडा तांदूळ खरेदी केला होता. देशांतर्गत तांदळाची गरज भागवण्यासाठी चीनने भारतीय तांदळाला पसंती दिली होती. मात्र आता सरकारने तुकडा तांदळावरील निर्यात बंद केल्याने चीनची कोंडी होऊ शकते. निर्यात बंदी आणि शुल्क वाढ यामुळे ब्राऊन राईस आणि साधा तांदळाच्या निर्यातीला मोठा फटका बसेल. तांदळाच्या एकूण निर्यातीत या दोन जातीच्या तांदळाचा जवळपास 60% वाटा आहे. आफ्रिका खंडातील नायजेरिया, सेनेगल, दिबोती, कॅमेरुन, बेनिन या गरिब देशांना तांदूळ निर्यात बंदीचा फटका बसणार आहे.