लांबलेला पावसाळा आणि त्यानंतर मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने मारलेली दडी यामुळे सामन्य जनतेला महागाईला तोंड द्यावे लागत होते. देशभरात मान्सूनच्या सुरुवातीलाच, म्हणजेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, डाळींचे भाव चांगलेच वधारले होते. कांदा, लसूण आणि हिरव्या मिरचीने देखील सामन्यांच्या खिशाला चांगलीच फोडणी दिली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईचा दर काहीसा नियंत्रणात आला असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
गेल्या महिन्यात, म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्यामुळे किरकोळ महागाईचा निर्देशांक देखील खाली आला आहे. किरकोळ महागाई दर ऑगस्ट 2023 मध्ये 6.83 टक्क्यांवर आला आहे.अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सांख्यिकी विभागाने ही माहिती सार्वजनिक केली आहे.
सर महिन्याला किरकोळ आणि घाऊक महागाईचा दर सांख्यिकी विभागाकडून जाहीर केले जातात. यामुळे सरकारला आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाला आवश्यक ती कारवाई करणे शक्य होत असते.
In August, Bharat's retail inflation decreased to 6.8% after reaching a 15-month high in July pic.twitter.com/pYvRD7RC8U
— Statistics Of India ?️ (@Feeds_stats) September 12, 2023
जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.44 टक्क्यांवर पोहोचला होता. हा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. किरकोळ बाजारात अन्नधान्यांच्या किंमतीत झालेल्या दरवाढीमुळे सामन्यांचे बजेट बिघडले होते. महागाईचा हा परिणाम काही दिवसच जाणवेल असे वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले होते. काही राज्यांमधील पावसाची अनियमितता आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरुवातीला झालेली अतिवृष्टी यामुळे पालेभाज्या आणि फळांचे चांगलेच नुकसान झाले होते. दळणवळणाच्या सुविधा प्रभावित झाल्यामुळे इतर राज्यांमध्ये भाजीपाला पोहचू शकत नव्हता. परंतु आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसते आहे.
जून 2023 मध्ये किरकोळ महागाईच्या चलनवाढीचा दर 4.81 टक्के होता. तो जुलैमध्ये थेट 7.44 टक्क्यांवर पोहोचल्याने सामान्यांना त्रास सहन कारावा लागला होता. आता किरकोळ महागाईने दिलासा मिळाला असला तरी आरबीआयच्या धोरणानुसार हा दर 4 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान असायला हवा. अजूनही किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांच्या वरच आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि आरबीआयला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.