Reserve Bank of India: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सोमवारी (दि.12 डिसेंबर) 13 को-ऑपरेटीव्ह बॅंकांवर दंड लावला आहे. हा दंड वेगवेगळे नियमांचे पालन न करण्यामुळे लावण्यात आला असून हा दंड 50 हजार रुपयांपासून 4 लाख रुपयांपर्यंत लावण्यात आला आहे. सर्वांधिक दंड लावलेल्या बॅंकांमध्ये महाराष्ट्रातील 3 बॅंकांचा समावेश आहे.
Table of contents [Show]
सर्वाधिक दंड महाराष्ट्रातील या 3 बॅंकांना
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्वाधिक म्हणजे 4 लाख रुपयांचा दंड चंद्रपूर जिल्ह्यात मुख्यालय असलेल्या श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेला लावण्यात आला आहे. त्यानंतर बीड जिह्यातील वैद्यनाथ अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बॅंकेला 2.50 लाख रुपये तर सातारा जिह्यातील वाई अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेला 2 लाख रुपयांचा दंड लावला आहे. याशिवाय मध्यप्रदेश राज्यातील इंदोरमधील इंदोर प्रीमिअर को-ऑपरेटीव्ह बॅंकेला 2 लाखांचा दंड लावण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पाटण नागरिक सहकारी बॅंक, पाटण, सातारा, जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटीव्ह बॅंक, अमरावती या बॅंकांना प्रत्येकी 1.50 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
आरबीआयने दंड का लावला!
आरबीआयने बॅंकांना त्यांचे कामकाज योग्य पद्धतीने करण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. भारतातीस सर्व बॅंकांना हे नियम पाळणे बंधनकारक आहे. जर आरबीआयच्या नियमांचे पालन बॅंकांकडून झाले नाही तर, आरबीआय या बॅंकांकडून दंड आकारू शकते किंवा त्यांना देण्यात आलेली बॅंकिंगची परवानगी सुद्धा नाकारली जाऊ शकते. बॅंकांकडून ग्राहकांची फसवणूक होत नाही ना, तसेच बॅंकेच्या कोणत्याही नियमामुळे बॅंकेच्या ग्राहकांचे किंवा मोठ्या समुहाचे नुकसान होत असेल तर आरबीआय अशा बॅंकांवर नियंत्रण आणू शकते. अशाच तक्रारींद्वारे आरबीआयने या बॅंकावर दंड आकारण्याची शक्यता आहे.
बॅंकेच्या ग्राहकांनी काय करावे!
आरबीआयने किंवा सरकारने एखाद्या बॅंकेवर कारवाई केली असेल किंवा त्या बॅंकेवर दंड लावला असेल, ग्राहकांनी गोंधळून न जाता किंवा त्या बॅंकेतील खाते थेट बंद न करता, त्या घटनेची माहिती बॅंकेच्या मॅनेजरकडून समजून घेणे गरजेचे आहे. आरबीआयने दंड का लावला? त्याची कारणे काय? त्याचा परिणाम ग्राहकांच्या ठेवींवर होणार का? अशा माहितीची खातरजमा करून घ्यावी. त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा.
बॅंकेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणे हा ग्राहकांचा हक्क!
प्रत्येक बॅंकेची संपूर्ण माहिती बॅंकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असते. त्या माहिती व्यतिरिक्त इतर माहिती तुम्हाला बॅंकेच्या मॅनेजरकडून मिळू शकते. पण एखाद्या माहितीमुळ बॅंकेची गोपनीयता धोक्यात येऊ शकते, अशी माहिती बॅंकेकडून दिली जात नाही. पण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणे हा तुमचा अधिकार आहे.