इलेक्ट्रिक कारची भारतातील वाढती मागणी पाहता रेनॉ कंपनीने या क्षेत्रात विस्ताराची तयारी सुरु केली आहे. भारतात परवडणारी इलेक्ट्रिक कार बनवण्याची रणनिती रेनॉ कंपनीने तयार केली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. Renault Kwid या लोकप्रिय कारचे मेड इन इंडिया व्हर्जन कंपनी लॉंच करण्याची शक्यता आहे. (Renault working on mass market electric vehicle for India)
इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत असली तरी ही वाहने अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा वेग मर्यादित आहे. या बाजारपेठेत टाटा मोटर्स आघाडीवर आहे. भारतीय कंपन्यांनी इलेक्ट्रिक कारची अनेक मॉडेल्स बाजारात आणली आहेत. ईव्हीच्या वाढत्या बाजारपेठेची रेनॉ कंपनीला भुरळ पडली आहे. रेनॉने भारतासाठी भारतातच पूर्णपणे तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीचा अभ्यास सुरु केला असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याविषयी वृत्त प्रकाशित केले आहे.
मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार ही हॅचबॅक श्रेणीतील असेल. यासाठी आवश्यक सुटे भाग भारतातच तयार केले जाणार असून स्थानिक पातळीवर जोडणी केली जाईल. वर्ष 2024 च्या अखेरिस रेनॉची ही परवडणारी इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. रेनॉ जपानच्या निसान कंपनीसोबत भारतात व्यवसाय करते. डिसेंबरअखेर दोन्ही कंपनी मिळून भारतात इलेक्ट्रिक व्हेईकलचा स्वतंत्र प्रकल्प सुरु करण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात हा प्रकल्प असेल. ज्यात कंपनी सुटे भाग तयार करेल. यामुळे केंद्र सरकारचे अनुदान देखील कंपनीला मिळणार आहे.
रेनॉने केवळ भारतासाठीच नव्हे तर जगभरातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रिक कारच्या नव्या मॉडेल्सबाबत स्ट्रॅटेजी आखली आहे. रेनॉचे सीईओ लुका डे मेओ यांनी भारत इलेक्ट्रिक व्हेईकलसाठीचे महत्वाचे मार्केट असल्याचे म्हटले होते. या रणनितीचा भाग म्हणून कंपनीने भारतावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. रेनॉकडून भारतात हॅचबॅक श्रेणीतील क्विड, एसयूव्ही प्रकारातील कायगर आणि ट्रिबर या कारची विक्री केली जाते. देशभरात कंपनीचे 500 वितरक आहेत.
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात प्रचंड संधी
वर्ष 2022 मध्ये भारत हे इलेक्ट्रिक कार श्रेणीत सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ ठरली होती. प्रत्यक्षात भारतात अजूनही इलेक्ट्रिक कारची विक्री 1% आहे. मात्र कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी प्रोत्साहन दिले आहे. वर्ष 2030 अखेर इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 30% पर्यंत वाढवण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे या क्षेत्रात येत्या काही वर्षांत प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. सरकारने ईव्हींवर देऊ केलेल्या सबसिडी आणि प्रोत्साहनपर योजनांमुळे इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या जागतिक पातळीवरील अनेक कंपन्यांनी भारतात गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहेत.