सुजित एका खासगी कंपनीत काम करतो. त्याला एकदा RBI च्या नावाने एक मेल आला.त्याने जेव्हा मेल वाचला तेव्हा त्याला 5 कोटींची लॉटरी लागली असल्याची माहिती मिळाली. मेल वाचताच तो नाचायला लागला. थेट RBI चा त्याला मेल आला होता, म्हणून त्याने अंधपणे त्यावर विश्वास ठेवला. मेलमध्ये त्याला विचारलेली माहिती त्याने वेळ न दवडता पाठवली. त्यात त्याचा पत्ता, पासपोर्ट साईज फोटो, बँक खात्याचा नंबर, PAN कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर अशी सगळी माहिती विचारली होती. दुसऱ्या दिवशी त्याला कुणा RBI च्या अधिकाऱ्याचा फोन आला, त्याचे अभिनंदन वैगेरे केले गेले. त्यांनतर त्याच्या मोबाईलवर आलेला OTP त्याला विचारला गेला, त्याने तो सांगताच त्याच्या बँकेच्या खात्यात असलेले 2 लाख रुपये कापले गेले. सुजितला आता काय करावं हेच सुचेना. त्याने परत जेव्हा त्या मोबाईलवर कॉल करायचा प्रयत्न केला तर मोबाईल स्वीच ऑफ येत होता. सुजितने थेट पोलीस ठाणे गाठले आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.सुजितला आता मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
ही कहाणी फक्त कुणा सुजितची नाही. असे खूप सारे लोक आहेत जे अशाप्रकारच्या आर्थिक फसवणुकीला बळी पडले आहेत. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपण सजग राहिलं पाहिजे. RBI कुणाला लॉटरी देत नाही किंवा बक्षीस देत नाही हे कायम लक्षात असू द्या. RBI या संस्थेचे मुख्य काम देशातील आर्थिक धोरणे ठरवणे, चलन पुरवठा करणे, बँकांना याबाबत मार्गदर्शन करणे हे आहे. लॉटरी किंवा बक्षीस देण्याचे काम नाही रिजर्व बँकेचे नाही!
मनीष हा मुंबईत राहणारा एक विद्यार्थी आहे , त्याला देखील असाच एक मेल आला. ब्रिटीश शासनाचे काही पैसे भारताकडे पडून आहेत, आणि ते तुम्हांला दिले जाणार आहेत असा त्या मेलमध्ये उल्लेख होता. RBI च्या rbi671@hotmail.com या मेल आयडीवर त्याच्या बँकेचे डीटेल्स पाठवण्याची विनंती त्याला करण्यात आली होती. मनीष हा वेळीच सावधान झाला. त्याने त्या मेलला उत्तर दिले नाही. हा फसवणुकीचा मेल आहे हे त्याने ओळखले होते. रिजर्व बँक ऑफ इंडिया ही सरकारी संस्था असून त्यांचा इमेल आयडी असा खासगी कंपनीचा असू शकत नाही याची जाणीव मनीषला होती. तसेच ब्रिटीश शासनाचा पैसा मला सरकार का बरे देईल हा प्रश्न देखील त्याला पडला. त्याने लागलीच RBI च्या अधिकृत मेल आयडीवर जाऊन सदर प्रकरणाबाबत माहिती दिली.
तेव्हा वाचकांनो, लक्षात असू द्या,RBI च्या नावे आलेले फोन किंवा मेल याची कसून चौकशी करा. RBI अधिकारी म्हणून कुणी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे ओळखपत्र मागा. फोनवर किंवा मेलवर कुठलेही व्यवहार करू नका. स्वतःची फसवणूक होण्यापासून स्वतःच स्वतःची मदत करा.