भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तत्काळ बँकाना 2000 च्या नोटांचे वितरण थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. 23 मे पासून आरबीआयने 2000 च्या नोटा परत स्वीकारण्यास सुरुवात केली होती. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत लोकांना या नोटा बदलून घेण्यासाठी मूदत देण्यात आली आहे. दरम्यान, चलनातील नोटा जमा करायला सुरुवात केल्यापासून आज अखेरपर्यंत 76% नोटा बँकेमध्ये जमा झाल्या असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
2.72 लाख कोटी मूल्यांच्या 2000 नोटा जमा
19 मे 2023 पर्यंत आरबीआयने 2000 च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेईपर्यंत एकूण 3.56 लाख कोटी मूल्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. तेव्हापासून 30 जून 2023 पर्यंत 2.72 लाख कोटी मूल्यांच्या दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत, अशी माहिती आरबीआयने इतर बँकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सोमवारी दिली आहे. त्यामुळे आता 0.84 लाख कोटी रुपय मूल्यांचा 2000 च्या नोटा चलनात आहेत किंवा अद्यापही जमा झाल्या नाहीत. आतापर्यंत चलनातून परत मिळालेल्या 2000 रुपयांच्या एकूण नोटांपैकी सुमारे 87 टक्के नोटा या ठेवी स्वरूपात आहेत आणि उर्वरित सुमारे 13 टक्के इतर मूल्यांच्या नोटा बँकेत बदलण्यात आल्या आहेत," RBI ने म्हटले आहे. सोमवारी एका निवेदनात.
30 सप्टेंबर पर्यंत जमा करा नोटा
आरबीआयकडून 2000 च्या चलनातील नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. नागरिकांनी वेळ काढून 2000 रुपयांच्या नोटा जमा कराव्या किंवा बदलून घ्याव्यात. तीन महिन्याचा वेळ असल्याने शेवटच्या क्षणी नोटा स्वीकारण्यासाठी कोणतीही घाई, गर्दी होणार नसल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.
खाते नसेल तरीही बदलता येतील नोटा-
लोक त्यांच्या 2,000 रुपयांच्या नोटा बँक शाखा आणि RBI च्या प्रादेशिक शाखांमध्ये बदलू किंवा जमा करू शकतात. खाते नसलेला व्यक्ती देखील कोणत्याही बँकेच्या शाखेत एकावेळी 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकतो, असेही आरबीयआयने स्पष्ट केले आहे.