अमेरिकेच्या (USA) नेतृत्वाखालच्या नेटो (NATO) सैन्याने अफगाणिस्तान (Afghanistan) सोडल्या सोडल्या तिथे तालिबान (Taliban) या मुस्लीम कट्टरतावादी संघटनेनं पुन्हा सरकार ताब्यात घेतलं. आणि त्यानंतर तिथले कायदेही हळू हळू रुढीवादी होत गेले आहेत. खासकरून महिलांवरचे निर्बंध परतले आहेत. आणि या गोष्टीला जगभरातून विरोधही होतोय.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीने मुली आणि महिलांवर पुन्हा निर्बंध लादले. यात कुटुंबातील पुरुष सदस्य बरोबर नसताना महिलांना प्रवास करता येणार नाही, घराबाहेर फिरताही येणार नाही, अशा नियमांबरोबरच तालिबानने महिलांचं शिक्षणही रोखलं. प्राथमिक शिक्षणानंतर मुलींना घराबाहेर पडून शिक्षण घेणंही शक्य होणार नाहीए. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या काम करण्यावर बंदी घालण्यात आलीय.
आणि नेमक्या याच नियमाला आणखी एक इस्लामिक राष्ट्र कतारने विरोध केलाय. कतारने तालिबान प्रशासनाला एक पत्र लिहून त्यात, ‘तालिबानच्या धोरणाविषयी अतिशय चिंता वाटत असल्याचं,’ त्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर महिलांच्या काम करण्यावर बंदी आणण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असंही कतारने म्हटलंय.
‘काम करणं हा महिलांचा हक्कं आहे. आणि आपल्यासाठी काम निवडणं आणि ते करणं हा मानवी हक्क आहे,’ असं कतारने म्हटलंय. कतारने असं मत व्यक्त करणं महत्त्वाचं मानलं जातंय. कारण, हा देश अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नेटो सैन्याबरोबर सुरू असलेलं युद्ध आणि त्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला या दोन्ही काळात तालिबान संघटनेच्या जवळ होता. युद्धाच्या वेळी तालिबान संघटनेचं प्रतिनिधी कार्यालय कतारमध्ये होतं. आणि अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून परतलं, तेव्हा झालेल्या शांतता बैठकाही कतारमध्येच पार पडल्या होत्या. आणि त्यासाठी कतारची निवड तालिबाननेच केली होती.