Scholarship for 10-12th Students: पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दहावी-बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे स्कॉलरशिपच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.
पुणे महानगरपालिकेच्या अर्थसहाय्य योजनेंतर्गत भारतरत्न डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपयांची मदत केली जाते. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेंतर्गत बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पालिकेतर्फे दरवर्षी दहावी आणि बारावी पास झालेल्या होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनांतर्गत मदत केली जाते.
भारतरत्न डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद ही योजना फक्त दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही योजना बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बेसिक पात्रता काय आहे? यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा? याची माहिती आपण घेणार आहोत.
अर्थसहाय्य योजनेचा लाभ कोणाला?
- ही योजना फक्त पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
- दहावी आणि बारावीमध्ये 80 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात
- पुणे महापालिका शाळा, रात्रशाळा आणि मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांसाठी टक्क्यांची पात्रता 70 टक्के
- जे विद्यार्थी 40 टक्के अपंग आहेत; त्यांच्याशाठी टक्क्यांची पात्रता 65 टक्के
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा
अर्ज कुठे करावा?
पुणे महापालिकेच्या या अर्थसहाय्य योजनेची जाहिरात पालिकेच्या समाज विकास विभागातर्फे वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली जाते. तसेच या योजनेबाबतची अद्ययावत माहिती (Latest Information) पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर अपडेट केली जाते व याच संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येईल.मागील वर्षी या योजनेसाठी पुणे महापालिकेने ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत अर्ज मागवले होते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील जुलैनंतर या स्कॉलरशिपसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थ्याचे आधारकार्ड
- कुटुंबाचे रेशन कार्ड
- कुटुंबाचे रहिवासी प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे बँक पासबुक
- विद्यार्थ्याचा जन्म दाखला
- पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्याची पावती
- दहावी/बारावीचे मार्कशीट
- महापालिकेचा टॅक्स भरल्याची पावती
- अपंग विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी)