Pune Darshan Bus: पुणे शहरातील प्रेक्षणीय स्थळांची सफर करण्यासाठी PMPML ची पुणे दर्शन बस हा चांगला पर्याय आहे. या बसमधून पुण्यातील 16 स्थळांची सफर होईल तेही फक्त 500 रुपयांमध्ये. पुणे परिवहन मंडळाने एसी बसची सुविधा देऊ केली आहे. त्यामुळे पुणेकर आणि पुण्यात येणाऱ्या नागरिकांना एकाच दिवशी सर्व स्थळे पाहण्याची संधी मिळेल.
तिकीट कसे बुक कराल?
इच्छुक प्रवासी ऑफलाईन तिकीट बुक करू शकतात. बसचे तिकीट फक्त 500 रुपये असून बुकिंग 1) डेक्कन जिमखाना, 2) पुणे स्टेशन, 3) स्वारगेट, 4) कात्रज, 5) हडपसर गाडीतळ, 6) भोसरी बस स्थानक, 7) निगडी व 8) मनपा भवन येथे करता येईल.
सहल सुरू होण्याची वेळ
सकाळी 8:30 वाजता सहल सुरू होईल तर 18:10 वाजता संपेल. केसरीवाडा, श्रीमंत दगडू शेठ गणपती मंदीर( बाह्यदर्शन) केळकर संग्रहालय पु. ल देशपांडे उद्यान यासारखी 16 प्रेक्षणीय स्थळे नागरिकांना पाहता येतील. 12 पेक्षा कमी प्रवासी असल्यास त्या दिवसाची पुणे दर्शन सेवा रद्द केली जाईल आणि परतावा दिला जाईल, असे पीएमपीएमएलने म्हटले आहे. पुणे स्टेशन डेपो आणि डेक्कन जिमखाना बस स्टॉप येथून बस सुटेल.
पीएमपीएमएलची विशेष पर्यटन सेवाही सुरू
मे महिन्यापासून PMPML ने विशेष पर्यटन सेवाही सुरू केली आहे. पुण्याच्या आजूबाजूची धार्मिक व पर्यटनस्थळे या सहलीत दाखवण्यात येतील. या सहलीचे सात मार्ग आहेत. ही खास सहल शनिवार आणि रविवारसाठी आहे. सहलीच्या प्रत्येक मार्गासाठी वेगवेगळे तिकीट आहे. खडकवासला धरण, पानशेत धरण, रामदरा, थेऊर गणपती, बालाजी मंदिर, अप्पूघर अशी अनेक प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांचा समावेश आहे.