आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःचे घर (Home) असावे असे स्वप्न असते. काहीजण आपल्या बजेटनुसार (Budget) तर काहीजण गृहकर्ज (Home Loan) घेवून जास्त किंमतीची घरं विकत घेतात. नुकताच इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रियल्टीचा वार्षिक अहवाल सादर झाला आहे. त्यात मागील वर्षात लक्झरी घरांच्या किंमती वाढल्याचे म्हटले आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 2022 मध्ये लक्झरी किंवा महागड्या मालमत्तांच्या (Luxury Properties) किमती 8-12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 2015 ची मागील सर्वोच्च पातळी ओलांडली आहे. इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रियल्टी (ISIR) ने ही माहिती दिली आहे. इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रियल्टीने आपल्या वार्षिक अहवाल 'लक्झरी आउटलुक सर्वेक्षण-2023' मध्ये म्हटले आहे की 2023-24 मध्ये 61 टक्के उच्च निव्वळ संपत्ती (HNI) आणि अल्ट्रा हाय नेट वर्थ (UHNI) लोक महागडी घरे खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
10 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता खरेदीची इच्छा
सर्वेक्षणात 500 हून अधिक HNI आणि UHNI चा समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षणात सहभागी 65 टक्के लोकांना 4 ते 10 कोटी रुपयांचे घर घ्यायचे आहे. तर 33 टक्के लोकांनी 10 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता खरेदी करण्याचा मानस व्यक्त केला. इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रियल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित गोयल म्हणाले की, कमी मागणी आणि देशाच्या आर्थिक वाढीमध्ये घरांची विक्री मजबूत आहे.
मुंबई, ठाण्यातील घरांच्या किंमती
घरांच्या किमतींचा डेटा अॅनारॉक रिसर्च या संस्थेने जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, MMR भागात 2015 मध्ये प्रतीवर्गफूट 10,280 रुपये मोजावे लागत होते. तीच किंमत आता11,2560 रुपयांवर गेली आहे. ही सरासरी वाढ झाली. तर मुंबईतल्या कुठल्या उपनगरांत सगळ्यात वाढ झाली याची माहिती देताना अॅनारॉक रिसर्चने म्हटलंय, ‘पनवेल आणि मिरारोड या दोन उपनगरांमध्ये घरांच्या किमती थेट 30% नी वाढल्या आहेत.’ मिरारोडमध्ये 2015मध्ये घरांच्या किमती सरासरी 10,800 प्रती वर्गफूट इतक्या होत्या. तिच किंमत आता 14,000 वर पोहोचली आहे. पनवेलमध्ये सात वर्षांपूर्वी 6,900 रुपये हा दर होता. तो आता 9,000 रुपयांवर पोहोचला आहे. ठाण्याच्या पूर्व भागात दरातली वाढ सगळ्यात कमी होती. 2015 मध्ये 17,550 रुपये प्रतीवर्ग फूट इतका दर 2022 मध्ये 19,300 रुपये प्रती वर्गफूटांवर पोहोचला. ही वाढ 10% होती.