Sugarcane price : यावर्षी पावसाने ओढ दिल्याने ऊसाच्या उत्पादनात घट होणार आहे. याचा परिणाम साखर कारखान्यांच्या (Sugar Mills) यंदाच्या ऊस गाळप हंगामावर देखील होणार असून साखर उत्पादनात घट होणार आहे. दरम्यान, 2023-24 च्या गाळप हंगामासाठी केंद्र सरकारकडून जून महिन्यात उसाच्या एफआरपीमध्ये 10 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना जास्त दर मिळणार आहे. तसेच केंद्र सरकार इथेनॉलच्या किंमतीमध्ये देखील वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणार एफआरपी-
केंद्र सरकारने जून 2023 मध्ये कमिशन फॉर अॅग्रिकल्चर कॉस्ट्स अँड प्राइजच्या शिफारशीनुसार उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ यंदाच्या म्हणजे 2023-24 च्या गाळप हंगामापासून लागू होणार आहे. त्यामुळे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 315 रुपये प्रति क्विंटल एफआरपी प्राप्त होणार आहे. याचा फायदा राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
ऊसाच्या तुटवड्याचा होणार फायदा?
महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. मात्र, यावर्षी ऊस पट्ट्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ऊस मिळवण्यासाठी दमछाक होण्याची शक्यता आहे. परिणामी जास्त ऊस मिळावा म्हणून साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांकडून ऊस मिळवण्यासाठी जास्त ऊसदर देण्याची स्पर्धा होण्याची चिन्हे दिसत आहे. याचा देखील शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो.
इथेनॉलच्या किंमतीमध्ये वाढ
देशात इथेनॉल (Ethanol) वापराचे E20 चे उदिष्ट गाठणे सरकारचे धोरण आहे. यासाठी इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून साखर कारखानदारांना उसापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे. दरम्यान राष्ट्रीय साखर कारखानदार संघटनाकडून देखील इथेनॉलच्या दरात वाढ करण्या संदर्भात मागणी करण्यात आली आहे. सध्या इथेनॉलला 65.61 प्रतिलिटर दर मिळत आहे. कारखानदारांकडून 69.85 रुपये प्रति लिटर दर देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान सरकारकडून या गाळप हंगामात इथेनॉलच्या दरामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये मकेपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात 6.01 रुपये प्रति लीटर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इथेनॉलच्या दरात वाढ झाल्यास शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उसदरातही वाढ होणे अपेक्षित आहे. निती आयोगाच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार उसापासून साखरे व्यतिरिक्त तयार होणाऱ्या उपपदार्थांच्या उत्पन्नातील 75 टक्के उत्पन्न शेतकऱ्यांना द्यावे, असे सूत्र आहे. जर या सुत्रानुसार दर लागू केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत रास्त भाव मिळू शकतो.