सोमवारी बाजारात चढ-उतार मोठ्या प्रमाणात दिसून आले. शेवटच्या तासात बाजारात सुधारणाही दिसून आली. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर बाजारात खरेदी-विक्रीला आज सुरुवात होईल. सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
सेन्सेक्स, निफ्टी मागील आठवड्याप्रमाणेच काल सोमवार 27 फेब्रुवारी रोजी घसरणीसह बंद झाले. बँकिंग स्टॉकमध्ये खरेदी होताना दिसत होती तर मेटल, आयटी, ऑटो आदी क्षेत्रांच्या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा समभागांवर प्रेशर दिसून आले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 175.58 अंकांनी म्हणजेच 0.30 टक्क्यांनी घसरून 59 हजार 288.35 वर बंद झाला तर निफ्टी 73.10 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांनी घसरून 17 हजार 392.70 वर बंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज बाजार उघडताना काय स्थिती असणार आहे ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आयसीआयसीआय बँकेने निफ्टीवर सर्वाधिक 2.17 टक्क्यांची वाढ नोंदवली तर पॉवरग्रीडमध्ये 2.16 टक्के वाढ इतकी नोंदवण्यात आली आहे. कोटक महिंद्रा बँक 1.80 टक्के, एचडीएफसी लाइफ 1.58 टक्के आणि एसबीआय 1.24 टक्क्यांनी वाढले आहेत. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस निफ्टीवर सर्वाधिक 9.74 टक्क्यांनी घसरून बंद झाली आहे. बजाज ऑटो 5.32 टक्के, यूपीएल 4.10 टक्के, टाटा स्टील 2.96 टक्के आणि इन्फोसिस 2.58 टक्के इतके कालच्या तुलनेत तोट्यात गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज या शेअर्समध्ये काय होते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
सध्या जागतिक बाजारपेठेत कमजोरी असून गेल्या आठवड्यात डाऊ जोन्समध्ये सलग चौथ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. काल सकाळी आशियाई बाजारावर खूप दबाव होता आणि सर्व प्रमुख निर्देशांकात घसरण झाली होती. अमेरिकेत पुन्हा एकदा महागाई वाढल्याने फेड रिझव्र्ह पुढील दोन-तीन बैठकांमध्ये व्याजदर वाढवू शकतो, असा कयास आता बाजारातील निरीक्षकांकडून बांधण्यात आला आहे. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 31 हजार कोटी रुपयांचे समभाग विकण्यात आले असून त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून येत आहे. याबाबत आता पुढची स्थिती कशी राहील ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.