तुम्ही आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्या अनेक गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये बँकेतील मुदत ठेव योजना (FD), म्युच्युअल फंडातील एसआयपी पद्धत (SIP), शेअर्स (Shares) विविध कंपन्यांचे बॉंड्स (Bonds) आणि पोस्टातील वेगवेगळ्या योजनांचा (Post Office Scheme) समावेश करण्यात आला आहे. तुम्हालाही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्टातील सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत (PPF) किंवा दीर्घकाळासाठी बँकेतील मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवणूक करू शकता. या योजनांमध्ये सर्वाधिक व्याज मिळत असल्याने जास्त परतावा मिळतो. महत्त्वाचं म्हणजे आयकर विभागा अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील घेता येतो. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी यातील व्याजदर, गुंतवणूक कालावधी, कर सवलत यासारख्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. त्याबद्दल आज जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
गुंतवणूक कालावधी जाणून घ्या
भारत सरकारने लोकांना गुंतवणुकीची सवय लागावी या हेतूने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेची सुरुवात केली. या योजनेचा गुंतवणूक कालावधी पंधरा वर्षाचा आहे. सलग पंधरा वर्ष या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर मोठा फंड तयार करता येऊ शकतो.
प्रत्येक बँकेमध्ये ग्राहकांना मुदत ठेवीत गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीचा कालावधी सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतचा असतो. बँक ग्राहकांसाठी विशेष मुदत ठेव योजना देखील राबवते. या योजनेचा कालावधी निश्चित असून यामध्ये मिळणारे व्याजदर सर्वाधिक असते.
व्याजदर जाणून घ्या
पोस्टकडून चालवण्यात येणाऱ्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत सध्या 7.10% व्याजदर देण्यात येत आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर ग्राहकांना चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. या योजनेतील व्याजदर सरकार निश्चित करते. ही गुंतवणूक खात्रीशीर पद्धतीमध्ये गणली जाते.
प्रत्येक बँकेचा मुदत ठेवीवरील व्याजदर हा वेगवेगळा असतो. गुंतवणुकीच्या कालावधीनुसार व्याजदर दिला जातो. सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीतील गुंतवणुकीवर साधारणपणे तीन टक्क्यांपासून दहा टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जातो.
किमान आणि कमाल गुंतवणूक जाणून घ्या
पोस्टातील सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत किमान 500 रुपये गुंतवावे लागतात. तर कमाल वार्षिक दीड लाख रुपये गुंतवता येतात.
बँकेतील मुदत ठेवीमध्ये किमान 1 हजार रुपये गुंतवता येतात, तर कमाल रकमेची गुंतवणूक निश्चित करण्यात आलेले नाही.
कर सवलत मिळते का?
पोस्टातील सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक कर सवलतीस पात्र आहे. आयकर विभागाच्या 80 सी अंतर्गत याचा लाभ घेता येतो. तसेच पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केलेल्या मुदत ठेवीत गुंतवलेली रक्कम कर सवलतीस पात्र आहे. याउलट पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवलेली रक्कम कर सवलतीस पात्र नाही. त्या उत्पन्नावरती टॅक्स कापला जातो.
गुंतवणुकीचे गणित समजून घ्या
पोस्टाच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत मासिक 1000 रुपयांची गुंतवणूक केली, तर वर्षाला 12000 रुपये गुंतवले जातील. पंधरा वर्षे सलग गुंतवणूक केल्यानंतर मॅच्युरिटी वेळी गुंतवणूकदाराला एकूण 3 लाख 25 हजार 457 रुपये परतावा मिळेल. या योजनेत एकूण गुंतवणूक 1 लाख 80 हजार रुपयांची असेल, तर व्याज 1 लाख 45 हजार 457 रुपये इतके मिळणार आहे.
बँकेच्या मुदत ठेव योजनेमध्ये 1 लाख 80 हजार रुपयांची पंधरा वर्षासाठी गुंतवणूक केली, तर 7.5 टक्के व्याजदराच्या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी 5 लाख 48 हजार 693 रुपये परतावा स्वरूपात मिळतील. यामध्ये 3 लाख 68 हजार 693 रुपयांचे व्याज मिळणार आहे.