आपण केलेल्या गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते. याच हेतमुळे अनेकजण म्युच्युअल फंडातील एसआयपी, शेअर्स, वेगवेगवेगळ्या कंपन्यांचे बॉण्ड यामध्ये गुंतवणूक करतात. मात्र अशा गुंतवणुकीत 100 टक्के परताव्याची हमी कधीच नसते. तसेच ही गुंतवणूक बाजारातील जोखीमेच्या अंतर्गत येते. प्रत्येकाने आर्थिक गुंतवणूक करताना सरमिसळ ठेवणे गरजेचे आहे.
सरकारकडून अनेक छोट्या बचत योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये सर्वाधिक परतावाही मिळतो आणि त्या 100 टक्के सुरक्षित व जोखिममुक्त असतात. तुम्हाला देखील जोखीममुक्त योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसमधील योजना हा एक उत्तम पर्याय आहे. पोस्टातील कोणत्या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 100 टक्के निश्चित परतावा मिळवू शकता, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF)
भारत सरकारने 1968 साली लोकांना गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) चालू केली. या योजनेत किमान 500 रुपये, तर कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. याचा गुंतवणूक कालावधी सुरुवातीला 15 वर्षाचा असून त्यानंतर प्रत्येकी 5 वर्षाचा आहे. यातील गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला 7.1 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. ही योजना पूर्णतः EEE कॅटेगरीमधील आहे.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
खास मुलींसाठी केंद्र सरकारने 2015 साली सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. या योजने अंतर्गत 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने पालक गुंतवणूक करू शकतात. या खात्यात किमान 250 रुपये, तर कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. याच मॅच्युरिटी कालावधी हा 21 वर्षाचा असून यामध्ये सर्वाधिक 8 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. ही योजना देखील EEE कॅटेगरीमध्ये येत असून यामध्ये कर सवलतीचा लाभ घेता येतो.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC)
पोस्टाकडून चालवण्यात येणारी आणखी एक जोखीममुक्त गुंतवणूक योजना म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना. या योजनेत गुंतवणूकदाराला 7.7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. या योजनेत 1000 रुपये भरून गुंतवणूक सुरू करता येते. याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षाचा आहे. या योजनेत गुंतवणूक करून कर सवलत मिळवता येते. आयकरच्या 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सवलत मिळवता येते.
टाईम डिपॉझिट योजना (TD)
पोस्टाची आणखी एक जोखीममुक्त योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना. या योजनेत 1,2,3 आणि 5 वर्षासाठी गुंतवणूक करता येते. या योजनेत किमान 1000 रुपये तर कमाल गुंतवणूक मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या योजनेत 6.9 टक्क्यांपासून ते 7.7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. या योजनेत 1.5 लाख रुपायांपर्यंतची गुंतवणूक कर सवलतीस पात्र आहे. मात्र यातील व्याज 40 हजार रुपयांहून अधिक असेल, तर मात्र TDS भरावा लागू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना व्याजाची मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली आहे.
किसान विकास पत्र योजना (KVP)
पोस्टाकडून चालवण्यात येणारी किसान विकास पत्र योजना देखील 100 टक्के सुरक्षित असून यामधील परतावा हा निश्चित स्वरूपातील आहे. या योजनेत 7.5 टक्के व्याजदर मिळत असून याचा मॅच्युरिटी कालावधी 115 महिन्यांचा आहे. या योजनेत किमान 1000 रुपये, तर कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
Source: hindi.financialexpress.com