जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसमधील योजना हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. यावर्षी देशाच्या केंद्रीय बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी खास महिलांसाठी 'महिला सन्मान बचत पत्र' (MSSC) योजनेची घोषणा केली.ही योजना दोन वर्षासाठी चालू करण्यात आली आहे. महिलांनी आर्थिक गुंतवणूक वाढवावी या हेतूने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
महिला यामध्ये 2 वर्षासाठी गुंतवणूक करून सर्वाधिक फंड तयार करू शकतात. ही योजना सुरुवातीला पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जात होती. मात्र आता अधिकृत बँकांच्या माध्यमातून ही योजना राबविली जात आहे. गुंतवणूक करणाऱ्या महिला बँकेमध्ये जाऊन देखील महिला सन्मान बचत पत्र खाते ओपन करू शकतात. या योजनेत 2 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर 2.32 लाखांचा परतावा मिळणार आहे. तो कसा, जाणून घेऊयात.
व्याजदर आणि कालावधी जाणून घ्या
महिला सन्मान बचत पत्र योजनेत (MSSC) दोन वर्षासाठी गुंतवणूक करता येते. 31 मार्च 2025 पर्यंत या खात्यात गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेत सरकारकडून 7.5% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ पद्धतीने व्याज गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केले जाते. या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा करपात्र असून यावर TDS कापला जात नाही.
2.32 लाखांच्या परताव्याचे गणित जाणून घ्या
ही योजना मुदत ठेवीप्रमाणे काम करते. या योजनेत महिला एकरकमी पैसे गुंतवून परतावा मिळवू शकतात. जर या योजनेत महिलांनी 2 लाखांची गुंतवणूक 2 वर्षांसाठी केली, तर चालू 7.5 टक्के व्याजानुसार गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवेळी 2 लाख 32 हजार 44 रुपये मिळतील. या योजनेतील निव्वळ व्याज हे 32 हजार 44 रुपये मिळणार आहे.