Mahila Samman Savings account: बँक ऑफ इंडिया ही पहिली सार्वजनिक बँक आहे जिच्या सर्व शाखांवर गुंतवणुकदारांना महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट खाते (MSSC) सुरू करता येईल. याबाबत बँकेने अधिकृत माहिती दिली आहे. या योजनेंतर्गत आधी फक्त पोस्ट ऑफिसमध्ये खाते सुरू करता येत होते. मात्र, आता बँक ऑफ इंडिया आणि काही खासगी बँकांमध्ये खाते सुरू करता येईल.
खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील पात्र बँकांना महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना सुरू करण्याची परवानगी अर्थ मंत्रालयाच्या अर्थ व्यवहार विभागाने 27 जून रोजी अधिकृतरित्या दिली. त्यानंतर ही सुविधा सुरू करणारी बँक ऑफ इंडिया ही पहिली सरकारी बँक ठरली. आता बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन MSSC खाते सुरू करता येईल.
1 फेब्रुवारी 2023 ला अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सितारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती. वैयक्तिक महिला MSSC खाते सुरू करू शकते. तर अल्पवयीन मुलीचे खाते पालकांच्या नावे उघडता येईल. या खात्यात कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करता येईल. तीन महिन्यांच्या अंतराने गुंतवणुकदार कितीही खाते उघडू शकतो.
MSSC खात्यावर व्याजदर किती
या खात्यावर 7.5% वार्षिक व्याजदर मिळते. प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ पद्धतीने व्याज गुंतवणुकदाराच्या खात्यात जमा केले जाते. या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा करपात्र आहे. मात्र, TDS कापला जात नाही.
MSSC खाते किती कालावधीसाठी सुरू करता येते?
खाते सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी परिपक्व होते. 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेंतर्गत खाते सुरू करता येईल.
वेळेआधी खाते बंद केले तर?
खातेधारकाचा मृत्यू, गंभीर आजार झाल्यास खाते वेळेआधी बंद करता येईल. खाते सुरू केल्यानंतर 6 महिन्यांच्या आत बंद करत असाल तर व्याजदरापैकी 2% दंड भरावा लागेल. त्यामुळे 5.5% व्याजदराने पैसे मिळतील.
खात्यातून निम्मी रक्कम काढता येते का?
खाते सुरू केल्यानंतर 1 वर्षानंतर गुंतवणुकदार 40% पर्यंत रक्कम काढू शकतो.