भविष्यातील आर्थिक गरजांचा विचार करून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्हाला देखील कमी जोखीम असणाऱ्या आणि सुरक्षित योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर सरकारकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक आर्थिक योजनांचा लाभ लोकांना घेता येतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका पोस्टातील योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर फक्त 10 वर्षात तुम्हाला दाम दुप्पटीहून अधिक परतावा मिळेल. कोणती आहे ती योजना, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना (Post Office Time Deposit Scheme)
पोस्टाकडून चालवण्यात येणारी टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit) ही एक बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदार 1, 2, 3 आणि 5 वर्षासाठी आर्थिक गुंतवणूक करू शकतो. तुम्हाला किती वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे, हे तुमच्यावर निर्धारित आहे. या योजनेत वार्षिक आधारावर लोकांना व्याजदर (Interest Rate) मिळणार आहे. जर तुम्हालाही यातून उत्तम परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. ही योजना मुदत ठेवीप्रमाणे (FD) काम करते. त्यामुळे निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक करून तुम्ही सर्वाधिक परतावा मिळवू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही केवळ 10 वर्षात दाम दुप्पटीहून अधिक परतावा मिळवू शकता.
वार्षिक आधारावर मिळेल 'इतका' व्याजदर
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत (Post Office Time Deposit Scheme) तुम्ही 1 वर्षासाठी आर्थिक गुंतवणूक केली, तर तुम्हाला 6.8% व्याजदर मिळणार आहे. 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला 6.9% व्याज मिळणार आहे. तर 3 वर्षासाठी 7 % व्याज देण्यात येणार आहे. दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करून केलेल्या 5 वर्षाच्या मुदत ठेवींवर ग्राहकांना 7.5% व्याजदर देण्यात येणार आहे. तुम्हाला या योजनेची अधिक सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता.
10 वर्षात दाम दुप्पटीहून अधिक परतावा कसा मिळवाल?
तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला प्लँनिंग करून गुंतवणूक करावी लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले, तर 7.5 टक्के व्याजानुसार तुम्हाला मूळ रकमेसह 2 लाख 24 हजार 974 रुपयांचे व्याज मिळेल. तुमची मुदत ठेव मॅच्युअर झाल्यानंतरही तुम्ही ही रक्कम काढू नका, त्याऐवजी पुन्हा 5 वर्षासाठी या रकमेची मुदत ठेव करा. ती रक्कम 10 वर्षांनंतर काढल्यास त्यावर 3 लाख 26 हजार 201 रुपयांचे व्याज मिळेल. त्यावेळी तुम्हाला मुद्दल आणि व्याज लागू करून 10 वर्षानंतर एकूण 10 लाख 51 हजार 175 रुपये परतावा स्वरूपात मिळतील.
कर सवलतीचा लाभ मिळेल का?
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेतील 1, 2 आणि 3 वर्षाच्या आर्थिक गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ घेता येणार नाही. गुंतवणूकदाराला यावर TDS भरावा लागेल. मात्र 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर आयकर कायदा 1961 अनुसार 80C चा लाभ घेता येणार आहे. 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला कर सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
Source: zeenews.india.com