2023 च्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) कारागीर आणि शिल्पकारांसाठीही एक योजना सुरू करण्यात आली आहे. याची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील कारागीर आणि शिल्पकारांनी आत्मनिर्भर भारतसाठी काम केले आहे. त्यांच्यासाठी प्रथमच मदत पॅकेज जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांनी कारागीर आणि शिल्पकारांसाठी विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही नवीन योजना जाहीर केली आहे. विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेला PM-VIKAS (PM-VIKAS - Vishwakarma Kausal Samman Yojana) या नावाने देखील ओळखले जाते. या योजनेंतर्गत पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ कोणत्या लोकांना मिळणार आहे? आणि या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे? ते जाणून घेऊया.
योजनेसाठी हे ठरणार पात्र
विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेंतर्गत सुतार, लोहार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या पारंपरिक कारागिरांना या योजनेसाठी पात्र मानले जाईल. ही योजना लवकरच सुरू होणार असून, त्याचा लाभ करोडो लोकांना मिळणार आहे.
काय फायदा होणार?
विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेंतर्गत कारागीर आणि शिल्पकारांना लाभ देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासोबतच लघुउद्योगांनाही चालना मिळणार आहे. याशिवाय हे लोक एमएसएमई साखळीशी जोडले जातील. ज्यांच्याकडे पुरेसे भांडवल नाही, त्यांनाही भांडवल दिले जाईल. यासोबतच कारागीर आणि शिल्पकारांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या योजनेच्या मदतीने स्वयंरोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.
कोणाला जास्त फायदा होणार?
ही योजना सुरू झाल्यानंतर तुम्ही त्यात अर्ज करू शकाल. या योजनेचा सर्वाधिक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला आणि दुर्बल घटकांना फायदा होईल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            