प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) 13 वा हप्ता रिलीज करण्यात आला आहे. कर्नाटकातील बेलगावी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16,800 कोटी रुपये ट्रान्सफर केले. 8 कोटी 2 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. परंतु, योजनेशी संबंधित काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 13व्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत. हप्ता का नाही आला? त्यामागे अनेक कारणे असू शकतात.
Table of contents [Show]
या कारणांमुळे हप्ता मिळण्यास अडचणी
पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) नोंदणी करताना, कोणतीही माहिती भरण्यात चूक करणे, चुकीचा पत्ता देणे किंवा चुकीचे बँक खाते देणे आणि एनपीसीआयमध्ये आधार सीडिंग न करणे, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) द्वारे रेकॉर्ड स्विकार न होणे किंवा शेतकऱ्यांकडून ई- केवायसी न केल्यास 13व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.
योजनेचे पैसे मिळाले की नाही असे तपासा
तुम्हाला योजनेचे पैसे मिळाले आहेत की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला (PM Kisan Scheme 13th Installment Details) pmkisan.gov.in वर भेट द्यावी. यानंतर तुम्ही येथे फार्मर कॉर्नरचा (Farmer Corner) पर्याय निवडा. पुढे तुम्हाला लाभार्थी स्थिती दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक, बँक खाते तपशील आणि मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. यानंतर Get Data या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे कळेल.
बँक खात्याचे तपशील असे ठीक करा
तुम्ही बँक तपशील ऑनलाइन दुरुस्त करू शकत नाही. तुमच्या बँकेच्या तपशिलांमध्ये काही चूक असल्यास, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल. तिथे जाऊन तुम्ही बँक खात्यातील तपशील दुरुस्त करू शकता.
पैसे न मिळाल्याबद्दल तक्रार कुठे करावी?
कृषी मंत्रालयाने लाभार्थ्यांना कळवले आहे की, जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यात पात्र झाल्यानंतरही पीएम किसान योजनेचे पैसे ट्रान्सफर झाले नाहीत, तर तो पीएम-किसान हेल्प डेस्कवर आपली समस्या मेलद्वारे सोडवू शकतो. तुम्ही pmkisan-ict@gov.in वर मेल करून माहिती मिळवू शकाल. याशिवाय तुम्ही 011-23381092 किंवा 155261 या हेल्पलाइन क्रमांकावरही कॉल करू शकता.