Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PharmEasy कंपनीचा वार्षिक तोटा 3,500 कोटींच्या वर, स्टार्ट अप का फसली?

HealthTech Company

फार्मइझी या हेल्थ टेक स्टार्टअपचं आर्थिक दुष्टचक्र अजून थांबलं नाहीए. आणि वर्षभरात 2000च्या वर झालेल्या तोट्यामुळे कंपनीला आपला आयपीओ ही मागे घ्यावा लागलाय. नवीन वर्षांत कदाचित नोकर कपातही करावी लागू शकते

औषधं (Medicines) आणि इतर फार्मसीची (Pharmacy Products) उत्पादनं ऑनलाईन नोंदणीनंतर (Online Medicines) घरपोच देणाऱ्या फार्मइझी या हेल्थ-टेक (Health-Tech) स्टार्टअपसाठी कंपनीसाठी 2022-23 हे आर्थिक वर्षं चांगलंच कठीण गेलंय. आणि कंपनीचा आतापर्यंत तब्बल 3,992 कोटी रुपयांचा तोटा झालाय. गेल्यावर्षी याच कालावधीत तोटा 641 कोटी रुपयांच्या घरात होता.    

या तोट्याचं कारण, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना देत असलेल्या आरोग्यविषयक सेवांवरच्या बजेटचं आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी कंपनीचे पाचपट पैसे जास्त खर्च झालेत. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून 2023 मध्ये कंपनीचा आयपीओ आणण्याचा प्रस्ताव तूर्तात स्थगित झालाय.    

फार्मइझी कंपनीचं नुकसान का झालं? PharmEasy What Went Wrong?  

फार्मइझीचा (PharmEasy) वार्षिक ताळेबंद बघितला की, काय चुकलं याची कल्पना येते. खरंतर गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीची मिळकत किंवा महसूल वाढलाय. पण, मागच्या एका वर्षांत कंपनीने जाहिराती आणि कर्मचाऱ्यांवर केलेला खर्च त्यापेक्षा खूप जास्त वाढलाय.    

फार्मइझी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना देत असलेल्या आरोग्य सुविधांचा खर्च हा कंपनीच्या खर्चाच्या एक षष्ठांश असतो. म्हणजे एकूण खर्चाचा सहावा हिस्सा. पण, 2022-23 वर्षांत हा खर्च 1,459 कोटी रुपये इतका झालाय. आधीच्या वर्षी तो 270 कोटी रुपये इतका होता. याखेरीज फार्मइझी कंपनीने 494 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले. आणि या सगळ्याचा परिणाम कंपनीचा एकूण खर्च 8,492 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला.    

कंपनीचा खर्च जरी वाढला असला तरी 2022-23 या वर्षांत कंपनीचा महसूलही वाढलेला दिसतोय. आधीच्या तुलनेत त्यात दुपटीने वाढ झालीय. आणि तो 5,729 कोटी रुपयांवर स्थिरावलाय. आणि चांगली विक्री होऊनही झालेला एकूण तोटा त्यामुळे नक्कीच कंपनीच्या चिंतेचा विषय असणार आहे. याशिवाय मुदतठेवी आणि कर्जांमध्येही कंपनीने केलेली गुंतवणूक फायद्याची ठरलीय.    

देशातील हेल्थ-टेक बाजारपेठ HealthTech Market in India   

फार्म इझी कंपनीची स्थापना धर्मिल सेठ आणि धवल शाह या दोघांनी मुंबईत 2014 मध्ये केली. हा एक ऑनलाईन फार्मा प्लॅटफॉर्म आहे, जिथे औषधं आणि फार्मसीतलं इतर सामान तुम्ही ऑनलाईन बुक करून घरपोच मिळवू शकता.    

हे स्टार्ट अप सुरू करताना फार्मइझीने पहिल्या 16 फंडिंग फेऱ्यांमध्ये 1.12 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक मिळवली होती. अगदी इन्फोसिसच्या नंदन निलकेणी यांनीही या कंपनीत सुरुवातीला गुंतवणूक केली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीचं मूल्यांकन 55 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात गेलं होतं. गेल्यावर्षी जून महिन्यात कंपनीने थायरोकेअर या टेस्टिंग कंपनीतली हिस्सेदारी विकत घेऊन लॅब टेस्टिंगच्या क्षेत्रातही प्रवेश केला. तो करार तब्बल 600 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा होता.    

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीला सेबीकडून आयपीओ काढण्यासाठी मान्यताही मिळाली. पण, कोसळणारा शेअर बाजार आणि तोट्यात असलेली कंपनी याचा विचार करून फार्मइझीने आयपीओ स्थगित केला. आता दुसऱ्यांदा कंपनीला आयपीओचा विचार पुढे ढकलावा लागला आहे.    

कोरोनाच्या काळात ऑनलाईन औषधं मागवण्याचा उद्योग फळाला येईल असा जाणकारांचा होरा होता. पण, प्रत्यक्षात हेल्थ-टेक कंपन्यांना नुकसानच सोसावं लागलं आहे. नेट-मेड, डॉकप्लस यासारख्या इतरही कंपन्या अजून नफ्यात आलेल्या नाहीत. आणि भारतात बाहेरच्या जगाच्या तुलनेत सर्वापर्यंत आरोग्यसेवा पोहोचली नसल्यामुळे तसंच आरोग्यविम्याची बाजारपेठही विकसित नसल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार या क्षेत्रात यायला फारसे उत्सुक नसतात.